सुवर्णालंकारांची पुन्हा विश्वभ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:46+5:302020-12-15T04:32:46+5:30

उत्कृष्ट दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता, सचोटी आणि बदलत्या काळानुसार विविध प्रकारचे पारंपरिक व अत्याधुनिक फॅशनचे दागिने सहज उपलब्ध असणे असा ...

World tour of gold ornaments again | सुवर्णालंकारांची पुन्हा विश्वभ्रमंती

सुवर्णालंकारांची पुन्हा विश्वभ्रमंती

Next

उत्कृष्ट दर्जा, शुद्धता, विश्वासार्हता, सचोटी आणि बदलत्या काळानुसार विविध प्रकारचे पारंपरिक व अत्याधुनिक फॅशनचे दागिने सहज उपलब्ध असणे असा जळगावच्या सुवर्णनगरीचा लौकिक सातासमुद्रापार पोहोचला आहे. मात्र यंदाच्या ऐन लग्नसराई, खरेदीचे विविध मुहूर्त याच काळात नेमके कोरोनाचे संकट ओढावले व शेकडो वर्षांच्या परंपरेत कधीही बंद न राहिलेली सुवर्ण बाजारपेठ ठप्प झाली.

सोने-चांदीचा व्यापार तसा जागतिक घडामोडीवरच अवलंबून असतो. त्याचे परिणाम नेहमीच येथे जाणवत असतात. यंदा तर जागतिक बाजारपेठच ठप्प झाल्याने साहजिकच सातासमुद्रापार पोहोचलेल्या येथील सुवर्ण अलंकारांचीही उलाढाल थांबली. इतकेच नव्हे येथे परप्रांतातील हस्तकारागीरदेखील गावी परतल्याने चिंता निर्माण झाली.

मात्र त्यानंतरही सुवर्ण व्यावसायिकांनी या संकटावर मात करीत पुन्हा भरारी घेतली व हस्तकारागीरदेखील न डगमगता सुवर्णनगरीत परतले.

कधी नव्हे अशी मिळाली झळाली

देशभरातील ग्राहक सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी जळगावात येतात. यंदा हे चित्र पुन्हा दिसेल की नाही याची चिंता असतानाच यंदा तर कोरोनाच्या संकटानंतर सुवर्णनगरीला कधी नव्हे अशी झळाली मिळाली. अनलॉकनंतर सुवर्णबाजार सुरळीत होऊ लागला व खरेदीही वाढली. नवरात्रोत्सव, विजयादशमी या काळापासून सोने-चांदीची खरेदी पुन्हा पूर्वीसारखीच सुरू झाली. धनत्रयोदशीला तर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी झाली व सुवर्णनगरीने नवा उच्चांक गाठला.

सुरक्षित गुंतवणूक

सोने-चांदीचे व्यवहार ठप्प असतानाच यंदा कधी नव्हे एवढ्या उच्चांकीवर भाव पोहोचले. त्यामुळे ग्राहकी राहणार की नाही, असे वाटत असतानाच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढला व सोने ६० हजारांच्या उंबरठ्यावर व चांदी ७७ हजारांच्या पुढे गेली असताना या मौल्यवान धातूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली, हे विशेष.

Web Title: World tour of gold ornaments again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.