जागतिक स्वेच्छा रक्तदान दिन : विद्यार्थ्यांनी दिला रक्तदान व पर्यावरण रक्षणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 11:58 AM2019-10-02T11:58:10+5:302019-10-02T11:58:51+5:30
रेडक्रॉस रक्तपेढीतर्फे सायकल रॅली
जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तपेढीच्यावतीने जागतिक स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त मंगळवारी काढण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी दिला रक्तदान व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या रॅलीमध्ये सेंट टेरेसा स्कूल आणि उज्ज्वल स्पाउटर इंटरनॅशनल स्कूलमधील १२५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सकाळी काव्यरत्नावली चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीच्या उद््घाटन प्रसंगी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, कोषाध्यक्ष सतीश चरखा, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारणी सदस्य जी.टी.महाजन, डॉ.अपर्णा मकासरे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, शिक्षक शैलेश जाधव आणि पवन सोनार उपस्थित होते. काव्यरत्नावली चौकातून आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, रेडक्रॉस भवन, चित्रा चौक, नेहरू चौकमार्गे खान्देश मॉल येथे पोहचली.
या रॅलीच्या समारोप प्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संगितले की, तुम्ही सर्व भावी रक्तदाते आहात. आपल्या रक्तदानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळते. आपण रक्तदान करण्यासाठी इतरांना प्रेरित करा. गनी मेमन यांनी ‘सिंगल युज’ प्लएॅस्टिक वापर बंद करण्याबाबत आवाहन केले. डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्व संगितले. आरोग्य अधिकारी उदय पाटील, महेंद्र पाटील व रेडक्रॉसचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान जीवनदान’, ‘जात धर्म पंथ कुठला ही भेद मानत नाही रक्तदान’, ‘रक्तदान करून वाढवूया आपल्या देह मंदिराची शान’, ‘आटत नसतो कधीच रक्ताचा झरा.....दर तीन महिन्यांनी रक्तदान करा’, ‘नॅट सुरक्षित रक्ताची मागणी करू या, आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे जीवन अधिक सुरक्षित बनवूया’, ‘नॅट प्रमाणित रक्त, सर्वात सुरक्षित रक्त’, ‘रक्तदान करके देखिये..अच्छा लगता है....’ ‘कुणाला तरी आयुष्य भेट म्हणून देऊ या...चला रक्तदान करूया..’ अशा प्रकारचे रक्तदानाचे घोषवाक्य तर ‘बनाये स्वच्छ सुरक्षित देश, इसलीये प्लॅस्टिक का करे निषेध’, पर्यावरण को अगर बचाना है..तो प्लॅस्टीक को उपयोग मे नही लाना है....’, ‘सबको आगे आना है, धरती को बचाना है....’ प्लॅस्टीक मुक्त जीवन, निरोगी आयुष्याला आमंत्रण’ ‘कहो प्लॅस्टीक को ना...पर्यावरण को हा...’ अशा प्रकारचे प्लॅस्टीक मुक्तिविषयीचे फलक विद्यार्थ्यांच्या सायकलवर लावण्यात आले होते.
सूत्रसंचालन उज्ज्वला वर्मा यांनी केले तर विनोद बियाणी आभार मानले. या प्रसंगी शैलेश जाधव आणि पवन सोनार यांचा डॉ. उदय टेकाळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. रेडक्रॉसच्या सर्व स्वयंसेवकांनी सहकार्य केले.