२५०० किलो भरीत बनविण्याचा जळगावात होणार विश्वविक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 02:02 PM2018-09-04T14:02:00+5:302018-09-04T14:02:55+5:30

शेफ विष्णु मनोहर यांची माहिती

World's Record: 2500 Kg | २५०० किलो भरीत बनविण्याचा जळगावात होणार विश्वविक्रम

२५०० किलो भरीत बनविण्याचा जळगावात होणार विश्वविक्रम

Next
ठळक मुद्दे२१ डिसेंबर रोजी बनविणार भरीत४००० किलो पेलणारी चुल

जळगाव : खान्देशी वाग्यांचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रम करणार आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक्स आॅफ वर्ल्डमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.
या उपक्रमाची माहिती खुद्द सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी सोमवारी जळगावात पत्रपरिषदेत दिली.
भरीत बनविण्यासाठी कोल्हापुरात तयार होतेय कढई
ते म्हणाले की, यावल तालुक्यातील बामणोद येथे भरीताच्या वाग्यांची शेती पाहून गेल्या वर्षीपासून खान्देशी भरीताला जगप्रसिध्द करण्यासाठी तयारी सुरू केली. २५०० किलो भरीत बनविण्यासाठी सागर पार्क हे ठिकाण निश्चित करण्यात आले. पाच ते सहा हजार नागरिक हा विक्रम बघू शकणार आहेत. भरीत बनविण्यासाठी कोल्हापूर येथे ४५० किलो वजनाची कढई तयार केली जात आहे़ ती १० बाय १० फुटाची असणार असून तीन फुट खोल असेल़ तिला चुलीवर ठेवण्यासाठी क्रेनची मदत घेणार आहे. जगात कुठेही भरीताचा विक्रम झालेला नाही. पुण्यात त्यासाठी सराव सुरु आहे.
आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या कार्यालयात मराठी प्रतिष्ठानतर्फे झालेल्या पत्रपरिषदेला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड़ जमिल देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, संध्या वाणी आदी उपस्थित होते़
भरीत बनविण्यासाठी लागणारा सराटा ११ फुट लांब असणार आहे़ गिनीज बुक्स आॅफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार भरीत बनविताना कुठल्याही यंत्राचा वापर होणार नाही़ ही प्रक्रिया करत असताना कढईजवळ स्वत: मी आणि देवराम भोळे व दत्तु चौधरी यांच्यापैकी एक जण सोबत असणार असल्याचे मनोहर यांनी सांगितले़ पहाटे ५ वाजेपासून भरीताचे वांगे भाजण्याला सुरूवात होईल़ पारंपरिक पध्दतीने ही संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे़ २० डिसेंबर रोजीच बामणोद येथून वांगे आणली जाणार आहेत.
विक्रमासाठी ३२०० किलो वांगे, १२० किलो तेल
सामग्री आधीच मैदानावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मराठी प्रतिष्ठानचे अ‍ॅड़ जमिल देशपांडे यांनी सांगितले़ या संपूर्ण उपक्रमासाठी ६० महिला, ४० पुरूष तसेच २० सुपरवायझर, २ मुख्यनिरीक्षक असे मनुष्यबळ असणार आहे़
४००० किलो पेलणारी चुल
भरीत बनविण्यासाठी ४००० किलो वजन पेलणारी चुल तयार करण्यात येणार आहे़ दोन दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेचे संपूर्ण व्हीडीओ केले जाणार आहेत, अन् विश्वविक्रमात नोंद घेण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. शेफ विष्णू मनोहर यांची आकाशवाणी चौकातून २१ डिसेंबरला ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.

Web Title: World's Record: 2500 Kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव