जळगावात व्याघ्र परिषदेत वाघांचा अधिवासाबाबत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:29 PM2017-12-09T17:29:03+5:302017-12-09T17:32:57+5:30
जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.९-जिल्ह्यातील वाघांचा अधिवास असल्याचे अनेकदा सिद्ध झाल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी वन्यजीव संरक्षण संस्था व पर्यावरणवाद्यांनी एकत्रित येवून, लोकप्रतिनीधींवर येथील वाघ वाचविण्यासाठी दबाव आणण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत व्याघ्र परिषदेत सहभागी व्याघ्र प्रेमींनी व्यक्त केले.
वसुंधरा चित्रपट महोत्सवातंर्गत पर्यावरण शाळेतर्फे शनिवारी नूतन मराठा महाविद्यालयातील डॉ.जगदिशचंद्र बोस सभागृहात व्याघ्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष व व्याघ्र अभ्यासक किशोर रिठे, यावल वनक्षेत्राच्या अधिकारी आश्विनी खोडपे, चंद्रपूर येथील व्याघ्र अभ्यासक बंडू धोत्रे, जळगाव येथील पर्यावरण तज्ज्ञ अभय उजागरे, वसुंधरा महोत्सवाचे संयोजक राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते. व्याघ्र परिषदेचे उदघाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
संरक्षित वनक्षेत्रे हीच खरी मंदिरे
किशोर रिठे म्हणाले की, संरक्षण वनक्षेत्राचे जाळे वाढणे गरजेचे आहे. लोकप्रतिनीधींनी देखील संरक्षित वनक्षेत्राचे महत्व जाणून घेणे गरज असून, संरक्षित वनक्षेत्र हेच खरे मंदिर असून, भविष्यातील रामावर जर का वनवास भोगण्याची वेळ आली. तर हीच वनक्षेत्र त्या रामाचे मंदिर राहणार आहे.
व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत पोहचावी
व्याघ्र संरक्षणाची मोहिम आता गावपातळीपर्यंत नेण्याची गरज आहे. ज्या भागात वाघ आढळून येत आहे. त्या भागात काम करण्याची गरज आहे. तसेच स्वच्छ भारताची मोहिम जी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. ती मोहिम आता वनक्षेत्रांमध्ये देखील राबविण्याची गरज असल्याचे मत रिठे यांनी व्यक्त केले.