बळीराजाचे कर्जाचे ओझे कमी होण्यापेक्षा मनस्ताप अधिक वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 09:11 PM2019-01-10T21:11:21+5:302019-01-10T21:11:49+5:30
एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था
प्रमोद पाटील
कासोदा, जि. जळगाव : कर्जमाफीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी हैराण झाले असून कर्जमाफीच्या अंमलबजावणीस एक वर्षाच्यावर कालावधी झाला असला तरी अद्यापही येथील २६१ शेतकºयांना कर्जमाफीच्या लाभाची प्रतीक्षा कायम आहे.
बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके व्हावे, या उद्देशाने सरकारने कर्जमाफी करण्याच्या निर्णय घेतला असावा, असे वाटणाºया बळीराजाच्या डोक्यालाच या योजनेतील घोळामुळे अधिक त्रास वाढला असल्याचे शेतकरी सांगत आहे. १३ हिरव्या याद्या आल्या व त्यानंतर महिनाभरापासून एकही यादी आलेली नाही. त्यामुळे ही कर्जमाफी फसवी तर नाही ? असा संतप्त सवाल या योजनेपासून वंचित शेतकरी करीत आहेत.
केवळ याद्याच याद्या, कार्यवाही शून्य
संपूर्ण कर्जमाफी न झाल्यामुळे दीड लाखाच्यावर कर्ज असलेले कर्जधारकदेखील माफी मिळेल या आशेने कर्ज भरत नाहीत. प्रत्येकवेळी तारीख वाढवून मिळत असल्याने घोळ अधिकच वाढला आहे. पूर्वी घोषीत केलेल्या कर्जमाफीच्या याद्या पूर्ण झाल्या नाही तरी २०१६-१७ च्या नव्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. केवळ याद्याच मागवल्या असून कार्यवाही मात्र कुठलीच नाही. जिल्ह्यात अशी एकदेखील विकास संस्था नाही की त्या संस्थेत शंभर टक्के कर्जमाफी झाली असेल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
कर्ज प्रोत्साहन योजना विरली हवेत
कर्ज प्रोत्साहन योजनेतदेखील अनेक शेतकरी शासन आदेशाची प्रतीक्षा आहेत. तर एक रकमी भरणा (वन टाईम सेटलमेंट ) योजनेत सुध्दा दहा-बारा वेळा मुदत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे संभ्रम अजून वाढला आहे. या योजनेचादेखील फायदा शेतकरी घेऊ शकत नसल्याचे चित्र परिसरात आहे.
पीक विम्याबाबत शेतक-यांवर अन्याय
पीक विमा बाबत तर मोठा अन्यायच एरंडोल तालुक्यावर झाला आहे. केळी व आंबा पिकांसाठीच पीक विमा मिळाला. मात्र एरंडोल तालुक्यात बागायती क्षेत्रच नसल्याने या पिकांना विम्याचा लाभ तालुक्यात होऊ शकला नाही. कापूस मका व इतर खरीप पिकांना तर एकाही शेतकºयाला हा लाभ मिळाला नाही. अत्यंत महत्त्वाच्या या विषयी सरकारने त्वरीत लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सहकार क्षेत्र मोडीस निघेल अशी वाटचाल तर सरकार करीत नाही ना असा सवालदेखील सहकार क्षेत्रातील जाणकार करीत आहेत.
वि.का. सोसायटींची बिकट स्थिती
कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी सोसायटीकडे भरणाही करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वि.का. सोसायटींची आवक थांबून त्यांची अर्थिक स्थिती बिकट झाली आहे. यात कर्मचाºयांचे पगारही देता येत नसल्याचे विदारक चित्र जवळपास सर्वत्र आहे, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे सरकारने हा घोळ लवकरात लवकर मिटवून शेतकºयांना दिलासा देण्यासह सोसायटींनादेखील बिकट स्थितीतून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कर्जमाफीविषयीचे सर्व प्रकरणे मार्च अखेर निकाली निघतील. वि.का.संस्थानी ज्या याद्या पाठविल्या आहेत, त्यापैकी कोणीही वंचित राहणार नाही. पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश नसून त्यात एरंडोल असल्याने पीक विम्याचा लाभ या तालुक्याला मिळणार नाही.
- विलास वाणी, विभागीय उप व्यवस्थापक जिल्हा बँक.
प्रत्येक वेळी कर्जमाफी संदर्भात याद्या मागवण्यात येतात. अशा किमान सहा वेळा याद्या पाठवल्या गेल्या आहेत. काही दुरूस्ती असल्याने पुन्हा-पुन्हा पाठवल्या आहेत. मात्र अजून हा घोळ मिटत नाही. सभासदांना कर्जमाफीची अपेक्षा असल्याने भरणा थांबला आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे पगार थांबल असून प्रवास खर्चासाठीदेखील संस्थेकडे पैसे नाहीत. विकासंस्थाना वाईट दिवस आले आहेत.
- दीपक वाणी, माजी चेअरमन, वि.का.सोसायटी कासोदा.