पितरांना मोक्ष मिळण्यासाठी आखाजी सणानिमित्त ३२५ घागरींचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:50+5:302021-05-15T04:15:50+5:30
स्वामिनारायण मंदिरात घागर भरण कार्यक्रम संपन्न नशिराबाद: जळगाव- नशिराबाद महामार्गावर दूरदर्शन टाॅवर जवळील नवनिर्माणाधीन स्वामिनारायण मंदिर येथे ...
स्वामिनारायण मंदिरात घागर भरण कार्यक्रम संपन्न
नशिराबाद: जळगाव- नशिराबाद महामार्गावर दूरदर्शन टाॅवर जवळील नवनिर्माणाधीन स्वामिनारायण मंदिर येथे अक्षय तृतीया सणाच्या पवित्र दिवशी पितरांना मोक्ष मिळण्यासाठी व घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी तब्बल ३२५ घागरी एकाच वेळेला भरून गोत्र नामोचार करीत तर्पण करण्यात आले. आगारी घालण्यात आली. या कार्यक्रमात परमपूज्य स्वामी गोविंद प्रसाददासजी यांचे आशीर्वाद आणि परमपूज्य शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी यांच्या मार्गदर्शनाने शास्त्री नयन प्रकाशदासजी , दिव्य प्रकाश स्वामी, अतुल भगत यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. याच दिवशी सतयुग, त्रेतायुग , कली युगाची सुरुवात झाली आणि ह्याच दिवशी भगवान परशुराम जन्मदिन आहे अशा पवित्र दिवशी आपल्या पितरांना वाडवडिलांना उद्देशून तर्पण कर्म करण्याची परंपरा प्राचीन काळापासून महाराष्ट्रात घराघरात चालत आलेली आहे. या दिवशी मातीची घागर आणून त्यावर फळ फुले ठेवून पूजा केली जाते आणि आगारी संपन्न करून गोडधोड, वडे भजे आमरस पुरणपोळीचा घास दाखविण्याची (भरवण्याची )प्रथा आहे.
यावर्षी अक्षय तृतीया सण असून कोरोना काळ लक्षात घेता, कोणतीही गर्दी न करता जळगाव स्वामिनारायण मंदिरात घागर भरण आणि पितृतर्पण कार्यक्रम वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चाराने ब्राह्मणामार्फत संपन्न झाला. यात जळगाव येथील ३२५ पेक्षा जास्त हरी भक्तांनी व्हाॅट्सॲप वर नावनोंदणी करून तेवढ्या मातीच्या घागरी आणून सर्व विधी संपन्न झाला.