एकाच गाडीचे पूजन करीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:16 AM2021-05-15T04:16:03+5:302021-05-15T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळद-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भवानी मातेचा जयघोष आणि हळद-कुंकवाच्या भंडाऱ्याची उधळण करीत दरवर्षी पिंप्राळा येथे भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या जल्लोषात बारागाड्या ओढण्यात येतात; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता एकाच गाडीचे पूजन करीत भवानी मातेचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
सकाळी भगत हिलाल बोरसे यांच्यासह तीन ते चार ग्रामस्थांनी पिंप्राळ्यातील भवानी माता मंदिराला सुरुवातीला पाच प्रदक्षिणा घातल्या. भवानी मातेचे पूजन झाल्यानंतर पिंप्राळा उड्डाण पुलाजवळ एकाच गाडीचे पूजन भगत हिलाल बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर तलाठी कार्यालयापर्यंत पायी चालत येऊन उत्सवाची सांगता करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला. यात्रोत्सवाला ७२ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी जिल्हाभरातून नागरिक हा उत्सव पाहण्यासाठी येतात. हा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. बारागाड्यांचा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची प्रचंड गर्दी होते, तर लहान मुलांसाठी झोके लावण्यात येतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून असे कुठलेही चित्र पिंप्राळ्यात पाहायला मिळाले नाही.