फर्दापूर ते जळगाव रस्ता सर्वाधिक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:19 PM2019-11-18T12:19:34+5:302019-11-18T12:19:45+5:30

जळगाव-औरंगाबाद महामार्ग : गडकरींच्या तंबीनंतर कामाला गती; तरीही जिल्ह्यातील टप्प्याचे काम धिम्यागतीने

Worst road from Fardapur to Jalgaon | फर्दापूर ते जळगाव रस्ता सर्वाधिक खराब

फर्दापूर ते जळगाव रस्ता सर्वाधिक खराब

googlenewsNext

जळगाव : जळगाव-औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दिलेल्या मक्तेदाराने सर्व रस्ताच खोदून ठेवत काँक्रीटीकरण रखडवल्याने जळगाव-औरंगाबादचा थेट संपर्क तुटल्यात जमा झाला होता. मात्र पावसाळा संपल्याने व केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तंबीनंतर खड्ड्यांमुळे उंचसखल झालेल्या रस्त्याचे थोडे सपाटीकरण केल्याने या मार्गाने वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
जळगाव ते फर्दापूरपर्यंतचा रस्ता सर्वाधिक खराब आहे. मात्र तरीही औरंगाबाद जिल्ह्यातील सुरू असलेल्या कामाच्या तुलनेत जिल्ह्यातील टप्प्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या कामाची गती वाढविण्याची गरज आहे.
जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मक्तेदाराने एकाच वेळी १४९ किमीचा रस्ता दोन्ही बाजूंनी खणून ठेवला आहे. काँक्रीटीकरणाचे काम मात्र दीड-दोन वर्षांपासून रखडवल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. साडेतीन तासांच्या प्रवासासाठी तब्बल ६ तास लागत होते. मात्र पर्याय नसल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावाच लागत होता. त्यातच पावसाळा सुरू झाला. यंदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या खोदून ठेवलेल्या राष्टÑीय महामार्गाचे अक्षरश: तळे होऊन गेले. तरीही याच रस्त्याने वाहनांची ये-जा सुरू होती. चिखलात, पाण्यात वाहने रूतून कोंडी होत असल्याचे फोटो व्हायरल होत होते, मात्र तरीही त्याकडे सत्ताधाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. जळगावहून पुण्याला जाणारा रस्ता हा औरंगाबादमार्गेच जातो. पुण्याला जळगावहून दररोज किमान ५० खाजगी लक्झरी बसेस जात असतात. मात्र त्यांनाही या रस्त्याने जाणे अशक्य झाल्याने धुळे-मनमाडमार्गे लांबचा फेरा मारून पुण्याला जावे लागत होते. तर काहींनी ४० किमीचा फेरा मारून चाळीसगावमार्गे औरंगाबादला जाण्याचा पर्यात स्वीकारला होता.
गडकरींच्या तंबीनंतर कामाला गती
अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. मात्र जळगाव व औरंगाबाद या दोन्ही शहरांकडून अजिंठा लेणींपर्यंत जाणारा रस्ता खराब असल्याने पर्यटकांना बेत रद्द करण्याची वेळ आली. परिणामी जगभरात बदनामी झाल्याने केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना ७ दिवसांत रस्ता सुरळीत करण्याची तंबी दिली. त्यानंतर पाऊसही थांबल्याने व ‘नही’तर्फे खड्डे पडलेल्या ठिकाणी सपाटीकरण केल्याने वाहतुक पुन्हा सुरू झाली आहे. आता औरंगाबादला जाण्यासाठी किमान ५ तासांचा कालावधी लागत आहे.

जळगावच्या टप्प्याचे काम धीम्यागतीने
जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या औरंगाबाद ते अजिंठा ९० किमीच्या टप्प्यातील कामातून अजिंठा घाट वगळला आहे. उर्वरीत रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गतीने होण्यासाठी काँक्रीट रस्ता करणारी चार मशिन्स लावण्यात आली असल्याचे दिसून आले. त्या तुलनेत फर्दापूर ते जळगाव या ६० किमीच्या टप्प्यासाठी मात्र केवळ एकच मशिन लावण्यात आले असल्याने काम धीम्यागतीने सुरू असल्याचे दिसून आले. मात्र छोटया नाल्यांवरील पुलांचे (मोरी) काम सुरू असल्याचे तसेच काँक्रीटीकरणही सुरू असल्याचे दिसून आले.

जळगाव-फर्दापूर रस्ता सर्वाधिक खराब
‘लोकमत’ प्रतिनिधीने औरंगाबाद ते जळगाव हा प्रवास एस.टी.बसने केला. त्यात औरंगाबाद ते अजिंठ्यापर्यंत टप्प्याटप्प्याने काम सुरू असल्याचे दिसून आले. तर मध्येच काम अपूर्ण असल्याने खराब रस्त्यावरून वाहने न्यावी लागत असल्याचे दिसून आले. मात्र तरीही औरंगाबाद ते अजिंठापर्यंत बसमध्ये जेवढे दणके प्रवाशांना बसत नाहीत, तेवढे दणके केवळ फर्दापूर ते जळगाव या ६० किमी रस्त्यावर बसत असल्याचे दिसून आले. तसेच अजिंठा घाट चौपदरीकरणातून वगळला आहे. मात्र तरीही त्या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. पावसामुळे या घाट रस्त्याची दूरवस्था झाली आहे. त्याचीही दुरूस्ती करण्याची गरज आहे.
 

Web Title: Worst road from Fardapur to Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.