‘जखम मांडीला, उपचार शेंडीला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:37+5:302021-01-15T04:14:37+5:30
मंजूर निधी - ४२ कोटी एकूण कामे - १२८ रस्त्यांवर होणारा खर्च - १६ कोटी लोकमत न्यूज नेटवर्क ...
मंजूर निधी - ४२ कोटी
एकूण कामे - १२८
रस्त्यांवर होणारा खर्च - १६ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - अडीच वर्षांपुर्वी मिळालेल्या १०० कोटींपैकी ४२ कोटींवरील स्थगिती शासनाने उठविली आहे. यामुळे जळगावकरांच्या समस्या सुटतील अशा अपेक्षा होती, मात्र सत्ताधाऱ्यांचा कारभारामुळे ‘जगणे असह्य झालेल्या जळगावकरांचे मरण सुसह्य’ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य समस्या रस्त्यांची असताना, त्यावर केवळ १६ कोटींचे नियोजन केले गेले आहे. तर खुले भुखंड विकसीत करण्यासाठी तब्बल ८ कोटींचे नियोजन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ‘जखम मांडीला अन् उपचार शेंडीला’ अशीच पध्दत सत्ताधाऱ्यांनी अवलंबली असल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेला नगरोथ्थान अंतर्गत मिळालेल्या १०० कोटी रुपयांपैकी ४२ कोटींच्या कामांवरची स्थगिती शासनाने उठविली आहे. ४२ कोटी रुपयांमधून शहरातील १२८ कामांच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. ४२ कोटी रुपयांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत असलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लागेल अशीच अपेक्षा जळगावकरांना होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ४२ कोटींपैकी १६ कोटी रुपयांमधून रस्त्यांचे डांबरीकरणाचे नियोजन केले आहे. मात्र, उर्वरित २६ कोटी रुपयांमध्ये अशा कामांचे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी घेतले आहेत, की ज्या कामांमुळे सर्वसामान्य जळगावकरांच्या अडचणी मार्गी लागतील असे काहीही दिसून येत नाही.
१. स्मशान भूमी सुशोभिकरण, दुरुस्तीसाठी दीड कोटी
१२८ कामांमध्ये दीड कोटी रुपयांचे ५ कामे हे स्मशान भूमीची दुरुस्ती, सुशोभिकरण, शेड तयार करणे या कामांमध्येच खर्च करण्यात येणार आहेत.
२. ८ कोटींचा निधी केवळ चेनलिंग फेन्सिंगवर होणार खर्च
४२ कोटींमधून ८ कोटींचा निधी शहरातील खुल्या जागांना कुंपनभिंत व चेनलिंग फेन्सिंगच्या कामांवर खर्च केला जाणार आहे. यासह गटारीचे कामे खुल्या जागांचा विकास विकास करण्याचे कामे देखील मनपा प्रशासनाने हाती घेतले आहेत.
रस्त्यांवर खर्च होणार १६ कोटी
या रस्त्यांचा समावेश
१.दुध फेडरेशन ते सीटी कॉलनी
२. गणेश कॉलनी ते कोर्ट चौक दरम्यानचा रस्ता
३.निमखेडी शिवार ते तालुका पोलीस स्टेशनसमोरील रस्ता
४. जुनी जैन फॅक्टरी ते नवीन महामार्गापर्यंतचा रस्ता
५. नित्यानंदनगर ते मेहरुण मधील मुख्य रस्ता
६. काव्यरत्नावली चौक ते वाघ नगर
७.प्रजापत नगर, सोना नगर, सुनंदिनी पार्क मधील रस्ते
८.कालींका माता मंदिर ते जुना खेडी रोड
९. हरिश स्वीट मार्ट ते आयएमआर महाविद्यालय