एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत दुकान मांडण्याआधीच काळाने घातला घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:36 AM2020-01-23T00:36:39+5:302020-01-23T00:37:26+5:30
पारोळ््याजवळ महामार्गावर अपघातात दोघे चुलतभाऊ जागीच ठार : पिकअप व टँकरच्या धडकेत झाले होत्याचे नव्हते
पारोळा : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावर तुराटखेडे गावालगत पिकअप व टँकरची जोरदार धडक झाल्याने या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना २२ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. यातील मयत दोघेही एका यात्रेतून दुसऱ्या यात्रेत कटलरी साहित्याचे दुकान मांडण्यासाठी जात होते. मात्र, तिथे पोहचण्याआधीच त्यांच्यावर हा अनर्थ ओढवला.
जळगाव येथील मासुमवाडी येथील रहीवासी शेख इक्बाल शेख ताहिर (वय २८), शेख आलताफ शेख वाहब (३२) हे दोघे चुलतभाऊ व त्यांच्यासोबत चालक वसिम पटेल (३०) हे तीन जण पिकअप वाहन (एमएच १५ ईव्ही २३८१)ने माहेजी येथून यात्रा आटोपून धुळे येथील रामबोरीस यात्रेत व्यवसायासाठी जात होते. राष्ट्रीय महामार्ग सहावर धुळ््याकडून येणारा टँकर (एमएच ४८, जे ५२२) हा पिकअप वाहनास जोराने धडकला. या अपघातात शेख इक्बाल, शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर टँकर चालक महेंद्र यादव (उत्तर प्रदेश) व पिकअप चालक वसिम पटेल (जळगाव) हे दोघ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती कळताच रुगणवाहिका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करीत अपघातातून मयतांना बाहेर काढले. कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादववर डॉ.योगेश साळुंखे व प्रशांत सोनवणे, डॉ.सुनिल पारोचे यांनी उपचार केले. सायंकाळी दोघांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात दिले.
पारोळा पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक शेख शफी यांच्या फिर्यादीवरून टँकरचालक महेंद्र यादवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कॅबिनमधून ओढून काढले
हा अपघात एवढा भीषण होता की चालकासह हे दोन्ही मयत गाडीच्या कॅबिनमध्ये अडकून पडले. ग्रामस्थांनी त्यांना कॅबिन तोडून बाहेर काढले.
अपघाताचे वृत्त कळताच नातेवाईकांनी थेट पारोळा कुटीर रुग्णालय गाठले. शेख अलताफ व मोहम्मद इकबाल यांचे मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.
मूळ मासुमवाडी (जळगाव) येथील हे दोघे चुलत भाऊ कटलरीचे व पोळपाट, लाटणे विक्रीचे साहित्य आपल्या वाहनात घेऊन चालक वसीम पटेलसह खान्देशात जिथे जिथे यात्रा असेल त्या ठिकाणी दुकान लावत. या महिन्यात ६ यात्रा करून ते पाचोरा तालुक्यातील माहिजीची यात्रा आटोपून धुळे तालुक्यातील राम बोरीस यात्रेसाठी निघाले होते. पण त्या आधीच त्यांचा दुर्दैवाने अपघातात मृत्यू झाला. ते दोघेही गरीब कुटुंबातील होते. अपघातानंतर वाहनातील साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले होते.
इकबालचे दीड वर्षापूर्वीच झाले होते लग्न
या अपघातात ठार झालेले अल्ताफ शेख वहाब मन्यार (वय ३२) व शेख इकबाल शेख ताहेर मन्यार (वय २७) दोन्ही एकमेकांचे नातेवाईक असून कासमवाडीला लागून असलेल्या हाजी अहमद नगरातील रहिवाशी होते. अल्ताफ याच्या पश्चातआई, वडील, पत्नी रहिनाबी, मुलगी सुफीया, फातिमा व मुलगा रेहान तर इकबाल याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले होते.आई, वडील, पत्नी रेहानबी व चार भाऊ असा परिवार आहे.