अरे व्वा... शाळा उघडतायत, आता घंटा वाजणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:28+5:302021-09-26T04:18:28+5:30

चाळीसगाव : ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची घंटा जुलैमध्ये वाजल्यानंतर शहरातील शाळा कधी उघडणार, याची प्रतीक्षा होती. मात्र ...

Wow ... the school is opening, now the bell will ring! | अरे व्वा... शाळा उघडतायत, आता घंटा वाजणार !

अरे व्वा... शाळा उघडतायत, आता घंटा वाजणार !

Next

चाळीसगाव : ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची घंटा जुलैमध्ये वाजल्यानंतर शहरातील शाळा कधी उघडणार, याची प्रतीक्षा होती. मात्र ४ ऑक्टोबरपासून आठवी ते १२ वीपर्यंतच्या शाळांची कुलुपे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचे पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील ४४ हजार ३११ विद्यार्थी शाळेची पायरी चढणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी तयारी पूर्ण केली आहे.

ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी वर्गापर्यंतच्या शाळा यापूर्वीच उघडण्यात आल्या आहे. मध्यंतरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून शहरातील शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला गेला. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचे सूतोवाच केल्याने विद्यार्थी सुखावले आहेत. शाळा उघडणार असल्या तरी कोरोनाची खबरदारी म्हणून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथी वगळता पाचवी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सलग सुरू होणार आहेत. शहरात मात्र पहिली ते चौथीसोबतच पाचवी ते सातवीपर्यंतच्या शाळा उघडण्याची प्रतीक्षा कायम आहे.

चौकट

शहरी भागात १५ तर ग्रामीण भागात १६७ शाळा

४ ऑक्टोबरपासून आठवी ते १२वीच्या १५ तर ग्रामीण भागातील १६७ शाळा उघडत आहेत.

-ग्रामीण भागातील इयत्तानिहाय विद्यार्थी असे

पाचवी-६३६६,

सहावी-६१८०,

सातवी-५९५६,

आठवी-५७५१.

एकूण-२४५५२

एकूण १५७७ शिक्षक असून ३४९ शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

-शहरी भागातील इयत्तानिहाय विद्यार्थी असे

आठवी-२०७१, नववी-२३७०,

१०वी-१०४८६, ११वी-२४६८,

१२वी-२३६४

एकूण-१९७५९

एकूण ३९६ शिक्षक तर १११ शिक्षकेतर कर्मचारी आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेणे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक आहे.

इन्फो

स्वागतार्ह निर्णय

शाळा सुरू होणार असल्याने शालेय वातावरणापासून दूर गेलेली मुले पुन्हा शिक्षण प्रवाहाशी जोडली जाणार आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू होत असल्याने हजारो विद्यार्थ्यांचा भावनिक व मानसिक विकासही चांगल्या प्रकारे होईल. या निर्णयाचे स्वागत करतो.

- डॉ. विनोद कोतकर,

सचिव, चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी

स्तुत्य निर्णय

राज्य शासनाने शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. पालकांसह विद्यार्थ्यांकडूनही गेल्या काही महिन्यांपासून शाळा कधी सुरू होणार, याविषयी विचारणा होत होती. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

-डाॅ. नियल दाखले,

मुख्याध्यापक, गुडशेफर्ड विद्यालय

शाळांच्या घंटा वाजणार असल्याने तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल. दुर्गम व ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षण कुचकामी ठरले होते. शाळा सुरू होणार असल्याने याचा फायदा या विद्यार्थ्यांना होईल. योग्य निर्णय आहे.

- मनोहर सूर्यवंशी, माध्यमिक शिक्षक, चाळीसगाव

शाळा सुरू होणार, हे ऐकूनच खूप आनंद झाला. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेऊ. मास्क वापरू. ऑनलाइनमुळे प्रभावी अभ्यास होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष शाळा सुरू होणे गरजेचे होते. आमचे यंदाचे १०वीचे वर्ष आहे.

-मानसी प्रवीण महाजन,

विद्यार्थिनी, इयत्ता दहावी

शाळा सुरू होणार असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून न भेटलेले मित्र-मैत्रिणी भेटतील. ऑनलाइन वर्गात मोबाइलच्या स्क्रीनवर दिसणारे गुरुजनही प्रत्यक्ष भेटणार आहेत. अभ्यासातील शंका विचारणेही सहज शक्य होईल. अभासी शाळेतून आम्ही बाहेर पडू. खूप छान वाटतंय.

-अनुष्का संदीप अग्रवाल,

विद्यार्थिनी, इयत्ता नववी

प्रत्यक्ष शाळा सुरू होणे गरजेचे होते. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. शाळांनी मात्र कोरोना आजाराची पूर्ण खबरदारी घ्यावी. विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात. सुरक्षित अंतरही ठेवणे गरजेचे आहे. अभासी व प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन क्रिया यात मोठा फरक आहे. शाळा सुरू होण्याचा निर्णयाचा आनंद झाला आहे.

- ज्योत्स्ना प्रवीण ठाकूर,

पालक, चाळीसगाव

Web Title: Wow ... the school is opening, now the bell will ring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.