विकासात्मक ऊर्जेसाठी साहित्यिकांनी लिखाण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:29 PM2020-01-05T22:29:31+5:302020-01-05T22:30:23+5:30
डॉ.चारुता गोखले : जामनेरला दहावे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन
जामनेर : आजच्या तरुण पिढीजवळ प्रचंड ऊर्जा आहे. नैराश्यामुळे ही पिढी व्यसनाधीन होताना दिसत आहे, किंवा वैफल्यग्रस्त असल्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. तरुणाच्या या ऊर्जेचे रूपांतर विनाशाकडून विकासामध्ये करण्यासाठी साहित्यिकांनी समर्थपणे लिखाण केले पाहिजे, असे प्रतिपादन जळगाव येथील ज्येष्ठ लेखिका डॉ. चारुता गोखले यांनी रविवारी येथे केले.
दहावे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या इमारतीत झाले. अध्यक्षस्थानी गोखले होत्या. बालसाहित्यिक गिरीश पाटील यांनी उद्घाटन केले. नगराध्यक्ष साधना महाजन प्रमुख पाहुण्या होत्या. तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांनी स्वागत करून संमेलनच्या आयोजनाची माहिती दिली. कथाकथन सत्रात स्वाती बेंद्रे व रमेश पांढरे यांनी कथा सांगितल्या. अध्यक्षस्थानी संध्या महाजन होत्या.
जिल्हास्तरीय स्पर्धेसोबतच तालुकास्तरीय काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात राजश्री गिरी यांच्या ‘एक सुंदर हिरवं झाड’, द्वितीय स्वाती लहासे यांच्या ‘बाबांचा आशीर्वाद’ व तुरटीच्या पीयूषा पाटील हिच्या ‘भाषेचा नजराणा’ या कवितांना मिळाले. प्राजक्ता पाटील हिच्या ‘पावसाच्या धारा’ व संध्या चव्हाण हिच्या ‘सावित्रीबाई फुले’ या कवितांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले.
शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग
शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या कविसंमेलनात न्यू इंग्लिश स्कूल, इंदिरा ललवाणी विद्यालय जामनेर, सावित्रीबाई फुले विद्यालय पहूर व रा.सु. जैन विद्यालय तोंडापूरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रास्ताविक डॉ.प्रशांत पांढरे यांनी, तर संचालन गणेश राऊत यांनी केले. जितेंद्र गोरे, सुकदेव महाजन, ना.का. शिंदे, श्रीकांत पाटील, प्रतिभा पाटील, अनिता पाटील आदींनी सहकार्य केले शंकर भामरे यांनी आभार मानले.