जळगाव जिल्ह्यातील ४५ शिक्षकांनी दिली चुकीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:23 PM2018-06-07T13:23:34+5:302018-06-07T13:23:34+5:30
जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आॅनलाईन बदलीसाठी तब्बल ४५ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी माहिती न आल्याने तसेच चाळीसगाव गटशिक्षणाधिकारी गैरहजर असल्याने दोघांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बी.जे.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दोन्ही तालुक्याची माहिती गुरुवारपर्यंत सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सर्व गटशिक्षणाधिकाºयांची बैठक बुधवारी दुपारी १२ वाजता झाली. शिक्षणाधिकारी पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचा तालुकानिहाय व संवर्गनिहाय आढावा घेतला. ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांच्या वर आहेत, दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अंध व अपंग आहेत, अशा ९ शिक्षकांनी संवर्ग एक नुसार चुकीची माहिती भरली आहे. पतीपत्नी एकत्रिकरणासाठी अंतर जास्त दाखवून लाभ घेणाºया संवर्ग २ मध्ये २२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरली आहे. तर अन्य संवर्गानुसार १४ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रकरणी संवर्गनिहाय माहिती घेऊन बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत मंगळवारी शिक्षण विभागाकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार सर्वच गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशी करीत माहिती सोबत आणली. मात्र जामनेर गटशिक्षणाधिकाºयांनी सोबत माहिती न आल्याने शिक्षणाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना सुनावले.
काय आहेत शिक्षक बदलीमधील घोळ
जिल्हा परिषदेच्या १८०० शाळांमध्ये ६ हजार शिक्षक कार्यरत आहे. त्यातील ९० टक्के शिक्षकांच्या बदली करणात आली. यावर्षी प्रथमच आॅनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ३० मे पर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ६ जून उजाडल्यानंतरही घोळ कायम आहे. जिल्हाभरातील ५५० विस्थापित शिक्षकांना अजूनही नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. तर काही शिक्षकांनी चुकीची माहिती भरून सोयीचे ठिकाण मिळविले होते. याविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
३४ शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव
जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलेल्या आॅनलाईन बदलीमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत जिल्हाभरातील ३४ शिक्षकांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बुधवारपर्यंत ३४ याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. अन्याय झालेल्या आणखी काही शिक्षकांकडून याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.