दहावीची परीक्षा रद्द केली; परीक्षा शुल्क कधी परत करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:05+5:302021-05-19T04:16:05+5:30
- स्टार : 723 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा ...
- स्टार : 723
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा शुल्कापोटी सुमारे २ कोटी ४२ लाख ०१ हजार ५५५ रुपये राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे रक्कम जमा झाली आहे. परीक्षा रद्द झाल्याने या शुल्काची रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. त्याबाबतच्या शिक्षण मंडळाच्या निर्णयाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या परीक्षेसाठी डिसेंबरपासून पुढे दोन महिने अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नियमित, विलंब आणि अतिविलंब शुल्क, अशी मुदत होती. परीक्षा शुल्क हे प्रति विद्यार्थी ४१५ रुपये होते. परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा जाहीर केले. पण, कोरोनाचा कहर थांबता थांबत नाही. दुसरीकडे बाधितांसह मृत्यूचे प्रमाणही वाढले. परिणामी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळानेदेखील निर्णय घेत दहावीची परीक्षा रद्द केली. ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना हे शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय शासनाकडून झालेला नाही.
------------------------------------
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा : ७८४
दहावीतील एकूण विद्यार्थी : ५८,३१७
प्रति विद्यार्थी परीक्षा शुल्क : ४१५
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम : २,४२,०१,५५५
----------------------------------
पुढे काय होणार, विद्यार्थी संभ्रमात
परीक्षा रद्दचा निर्णय योग्य आहे. पण, पुढील प्रवेशप्रक्रिया कशी राबविणार याबाबत अजूनही शासनाने निर्णय घेतलेला नाही. हे शिक्षण विभागाने स्पष्ट करून आमचा संभ्रम दूर करावा.
- नेहा चंदेले, विद्यार्थिनी
--------------
दहावीचे अंतर्गत मूल्यमापन लवकर करावे. तसेच शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्क परतीचा निर्णय सुद्धा लवकर घ्यावा. अकरावी प्रवेशासाठी कुठली प्रक्रिया राबविणार आहे. याबाबत माहिती त्यांनी लवकरात लवकर द्यावी.
- आदिती भालेराव, विद्यार्थिनी
------------
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असेल, तर हरकत नाही. सीईटीच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यावा. तसेच परीक्षा शुल्काची रक्कम सुद्धा विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी. कोरोनामुळे आधीच सर्वांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे.
- गणेश कोळी, विद्यार्थी
---------------------------
यंदा कमी झाली होती परीक्षार्थींची संख्या
मागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार ५० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, यंदा ५८ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. बारावीसाठी गेल्या वर्षी ५९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यंदा ४९ हजार ४०३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. दरम्यान, बारावीची परीक्षा होणार की नाही, याबाबत कुठलीही स्पष्टता शासनाकडून करण्यात आलेली नाही.