बनावट दस्तावेज प्रकरणी भुसावळच्या नायब तहसीलदारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:40 PM2022-07-31T23:40:38+5:302022-07-31T23:41:30+5:30
नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक
भुसावळ जि. जळगाव: तहसीलदारांची बनावट स्वाक्षरी व शिक्के तयार करुन भूखंडाच्या विक्रीस परस्पर परवानगी दिल्याचा प्रकार भुसावळात उघडकीस आला आहे. या प्रकरणी शासनाची फसवणूक केल्याने नायब तहसीलदार शशिकांत जनार्दन इंगळे व लिपिक शाम तिवारी यांना अटक करण्यात आली. रविवारी रात्री भुसावळ शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी १० जणांना बेकायदेशीर प्लॉट विक्री केली. याप्रकरणी वसुली अधिकाऱ्यासह प्लॉट घेणारे १० जण अशा एकूण ११ जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत नायब तहसीलदार शोभा घुले यांनी फिर्याद दिली होती. त्यावरुन रविवारी ही कारवाई करण्यात आली. या फसवणूक प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन आणखी काय सत्य बाहेर येतं, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.