यावलला रोकडसह साडेदहा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:21 PM2017-08-31T13:21:35+5:302017-08-31T13:22:56+5:30
धाडसी चोरी : शहरातील आतार्पयतची सर्वात मोठी चोरी
ऑनलाईन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. 31 - बाबा नगरातील रहिवाशी शकिलखान सुलतानखान यांच्या घराच्या खिडकीतून अज्ञात चोरटय़ाने घराचा दरवाजा उघडून कपाटातील एक लाख 85 हजार रूपयाच्या रोकडसह सुमारे 30 तोळे सोन्याचे व पाऊण किलो चांदीचे दागिने लंपास केले. सुमारे 10 लाख 50 हजार रुपयांवर चोरांनी डल्ला मारला आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.
शकीलखान यांचे कुटूंब घरात झोपलेले असताना चोरटय़ांनी हा डाव साधला. या घटनेने परिसरात भीती व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी, सपोनि योगेश तांदळे, फौजदार अशोक अहिरे, सुनिता कोळपकर यांनी घटनास्थळी पोहचले. श्वानपथकाने नदीकाठापयर्ंतचा मार्ग दाखवला. ठसे तज्ज्ञांनी ठश्यांचे नमुने घेतले आहेत.
येथील खडकाई नदीच्या तीरावरील बाबा नगरातील रहिवाशी शकिलखान सुलतानखान हे कुटुंबियासमवेत घरात झोपलेले असताना बुधवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरटय़ांनी सरकती खिडकी सरकवून दरवाजा उघडला व घरात प्रवेश करत घरातील दोन्ही कटापामधील सोन्या चांदीचे दागीने व एक लाख 85 हजार रुपए रोख असा सुमारे 10 लाखाचा 50 हजाराचा माल लंपास केला आहे. बकरी इद निमीत्ताने सद्या मुस्लीम बांधवांचे तीन दिवशीय उपवास सुरू आहेत. त्यासाठी हे कुटुंब रात्री साडेतीन वाजता झोपेतून उठले असता आलमारीतील सामान त्यांना अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. या घटनेने भयभीत झालेले शकीलखान यांनी पहाटे साडेचार वाजता पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.