यावल ग्रामीण रुग्णालय चालते ‘प्रभारीं’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:07 PM2019-06-01T18:07:26+5:302019-06-01T18:08:44+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
डी.बी.पाटील
यावल, जि.जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामीण रुग्णालयात एकही नियमित डॉक्टर नसल्याने हे रुग्णालय केवळ प्रथमोपचार केंद्र ठरत आहे. प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णांना जळगावला न्यावे लागते. यामुळे तो खर्चिक उपचार ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासह विविध समस्यांनी हे ग्रामीण रुग्णालय ग्रासले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ग्रामीण रुग्णालय ‘प्रभारीं’वर चालते. लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
गेल्या ३० वर्षांपासून सुरू झालेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात आजपर्यंत वर्ग १चे पद असलेले वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. यासह डॉक्टरांची पदे गेल्या अनेक वर्षापासून ११ महिन्यांच्या करारावर भरली जातात. त्यामुळे डॉक्टर मंडळी येथे येण्यास अनुत्सुक असतात. परिणामी अनेक दिवस ही पदे रिक्त राहतात. या काळात बाह्यरुग्ण तपासणीसाठी शालेय आरोग्य पथकाचे डॉक्टर तपासणी करतात. त्यानंतर दिवसभर रात्री एकही डॉक्टर राहत नसल्याने आदिवासी भागासह तालुक्यातील खेड्या-पाड्यातून आलेल्या रुग्णावर आरोग्य सेविका प्राथमिक उपचार करतात. त्यानंतरच्या उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात येते. रुग्णांना जळगावातील शासकीय उपचार खर्चिक आणि तापदायक पडत असल्याने रुग्ण खासगी दवाखान्याकडे वळत आहेत.
रिक्त पदे
वर्ग १- वैद्यकीय अधीक्षक- मंजूर १, रिक्त पद १, वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे ३, रिक्त पदे ३, अधिपरिचारिका- रिक्त १, वाहनचालक रिक्त १, अशी पदे रिक्त आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेपासूनच पुरूष आरोग्य सेवकाचे पद येथे भरण्यात आलेले नाही. पुरूष आरोग्य सेवकाची रुग्णालयास गरज आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आमदार हरिभाऊ जावळे आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात रुग्णालयातील समस्यांचा पाढा कथन करण्यात आला आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना निवासस्थाने नाहीत. त्यामुळे आरोग्य आरोग्य कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
रुग्णालयाच्या आवारात असलेली ड्रेनेजची मुख्य पाईपलाईन चोकप झाली आहे. यामुळे रुग्णालयाच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यातूनच रुग्ण व कर्मचारी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आवारातील कूपनलिकेतील पाण्याची पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे रुग्णालयाच्या वापरासाठी पाण्याचा तुटवडा पडत आहे. तसेच पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. अशा आशयाचे निवेदन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष सांगोळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व आमदार जावळे यांना दिले आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचे भिजत घोंगडे
ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करावे यास शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जागा कमी पडते. परिणामी येथे उपजिल्हा रुग्णालय होईल किंवा नाही याबाबत तालुकावासीयांच्या मनात शंका आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केल्यास ते निश्चित होऊ शकेल. रुग्णालयास लागून नगरपालिकेचा बंद पडलेला कोंडवाडा आहे. त्यात आता कोंबडीबाजार भरतो आणि त्यास लागूनच वनविभागाच्या निवासस्थानाची जागा आहे. वनविभागाची निवासस्थाने संपूर्णपणे जीर्ण झाल्याने तेथे कोणीही राहत नाही. या दोन्ही जागा आरोग्य विभागाकडे हस्तांतरण केल्यास उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. अर्थात त्यासाठी लोकप्रनिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे. आमदार हरिभाऊ जावळे, खासदार रक्षा खडसे यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे.