यावल तालुक्यात आदिवासी पाड्यावरील लसीकरण मोहीम फत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 02:49 PM2018-12-14T14:49:24+5:302018-12-14T14:50:13+5:30
यावल , जि.जळगाव : यावल तालुक्यात गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मग ती गावे रस्त्यावरची ...
यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यात गोवर-रुबेला लसीकरणाची मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी आरोग्य विभागावर आहे. मग ती गावे रस्त्यावरची असोत की दुर्गम भागातील वैद्यकीय पथकास तेथे जावेच लागते.
तालुक्याच्या सीमेवरील सातपुड्याच्या कुशीत अनेक आदिवासी वस्त्या, पाडे अत्यंत दुर्गम भागात आहेत. येथे जाण्यासाठी सातपुड्याच्या डोंगर-कपारीतून पायवाटेने जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सुमारे १५०-२०० आदिवासी वस्तीच्या आंबापाणी वस्तीवर १२ किलोमीटर पहाडी रस्त्याने जाणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच जावे लागते. वैद्यकीय पथकाने या वस्तीवर जावून लसीकरणाची मोहीम नुकतीच फत्ते केली. वस्तीशाळेच्या पटावरील ३९ पैकी ३७ विद्यार्थ्यांना पथकाने लसीकरण केले. दोन विद्यार्थी आजारी असल्याने त्यांना लस दिली नसल्याचे पथकाने सांगितले.
तालुका सीमेवरील सातपुड्याच्या कुशीतील आंबापाणी आदवासी गाव हे अत्यंत दुर्गम भागात आहे.
येथील लसीकरणासाठी डॉ.गौरव भोईटे, डॉ.प्रवीण ठाकरे हे पथकासह दुचाकीवरुन जाण्यासाठी निघाले, मात्र सातपुड्यातील दाट झाडी, उतार-चढावाचा रस्ता, वाटेतील मोठमोठे खडक आणि दगड यामुळे दुचाकी चालवणे जिकरीचे झाले.
दोन-तीन वेळा दुचाकी घसरून पडली. अखेर पथकाने सातपुड्याच्या कुशीतच दुचाकी सोडून सुमारे १२ किलोमीटर डोंगर-माथ्याचे अंतर पायी कापून पथक आंबापाणी वस्तीवर पोहचले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी लसीकरण मोहिमेत १०० टक्के सहभागी होण्याचे केलेले आवाहन आणि वैद्यकीय पथकाची जिद्द त्यात अनेक ठिकाणी होत असलेला विरोध, त्यातही आदिवासी वस्तीवरील ही विद्यार्थी लसीकरणास सहभागी होतील की नाही, ही शंका पथकाच्या मनात होतीच, मात्र आदिवासी बांधवांना डॉ.गौरव भोईटे, डॉ.प्रवीण ठाकरे यांनी गोवर आजारापासूनचा अपाय आणि लसीकरणाचे लाभ यांची पालकांना जाणीव करून दिल्यानंतर आदिवासी पालकांनी आपल्या सर्व बालकास प्रोत्साहीत करून ३९ पैकी ३७ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याने डोंगर-माथ्याचा रस्ता पार करून आलेल्या पथकासही आनंद झाला. आदिवासींशी बोलून त्यांनी आनंद व्यक्त केला. पथकात आरोग्यसेविका जुनव तडवी, आरोग्य सेवक लुकमान तडवी, अरविंद जाधव, शिवप्रताप घारू या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.