यावलला भीमगीतांच्या कार्यक्रमाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:01 PM2019-06-12T16:01:22+5:302019-06-12T16:05:13+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावल, जि.जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुध्द जयंतीनिमित्ताने येथील आर.पी.आय.च्या वतीने आठवडे बाजारात औरंगाबाद येथील पंचशिला भालेराव यांचा भीमगीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिक्षणाअभावी इतिहासात समाजबांधवांची काय दशा होती, मात्र डॉ.बाबासाहेबांनी समाजाला जो शिक्षणाचा उपदेश दिला आणि त्यानंतर समाज आज काय आहे याचे वर्णन करतांना गायिका पंचशिला यांनी माया भीमानं सोन्या....नं भरली ओटी या गाण्यानं उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. अक्षरश: या गाण्यावर स्त्री-पुरुषांनी ठेका धरल्याने गायिकादेखील व्यासपीठावरून खाली उतरून त्यांना साथ दिली. या गाण्यासह अनेक गाण्यांमधून बाबासाहेबांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला व समाजप्रबोधन केले.
कार्यक्रमास येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन, आर.पी.आय. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, आनंद बाविस्कर, जगन सोनवणे, रवींद्र खरात, तालुकाध्यक्ष अरूण गजरे, विशाल गजरे, संतोष गजरे, मुश्ताक शेख हसन, विकी भालेराव, सागर गजरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.