यावलच्या सराफाला लुटणा-या एकाला पिस्तुलसह पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 08:07 PM2019-04-15T20:07:20+5:302019-04-15T20:09:15+5:30
पिस्तुलाचा धाक दाखवून यावलच्या सराफाला लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पांडे चौकात सापळा लावून पकडले. गौरव भरत कुवर (२९, रा.कासमवाडी, जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
जळगाव : पिस्तुलाचा धाक दाखवून यावलच्या सराफाला लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास शहरातील पांडे चौकात सापळा लावून पकडले. गौरव भरत कुवर (२९, रा.कासमवाडी, जळगाव) असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तुल व तीन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल येथील श्रीनिवास नंदकिशोर महालकर (४२) यांचा सराफाचा व्यवसाय आहे. रविवारी दुकान बंद करुन ते घरी जात असताना आकाश सुरेश सपकाळे, गौरव भरत कुवर (दोन्ही रा.जळगाव), चेतन कोळी व यश उर्फ गोलु पाटील (दोन्ही रा.यावल) या चौघांनी महालकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करीत ५ लाख ६२ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २ लाख २३ हजार ६०० रुपये किमतीची सात किलो ५७० ग्रॅम चांदी असलेली बॅग हिसकावून पळ काढला होता.
पांडे चौकात लावला सापळा
या दरोड्यातील एक संशयित जळगाव शहरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांना मिळाली होती. सर्व अधिकारी व कर्मचारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्तात असल्याने रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्याशी चर्चा करुन पथक तयार केले. उपनिरीक्षक सुधाकर लहारे, शरीफ काझी, युनुस शेख, सूरज पाटील, दत्तात्रय बडगुजर, प्रकाश महाजन व दर्शन ढाकणे अशांच्या पथकाने मध्यरात्री पांडे चौकात साध्या गणवेशात सापळा लावला. गौरव हा चौकात येताच पथकाने त्याला घेरले. अंगझडती त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व तीन जीवंत काडतूस आढळून आले. दरम्यान, त्याच्या अन्य साथीदार व मुद्देमालाची चौकशी पथकाकडून केली जात आहे. गौरव याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला.