यंदा पहिल्यांदाच घरोघरी नमाज अदा करून ईद साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:48 AM2020-05-26T11:48:27+5:302020-05-26T11:48:39+5:30
उत्साहात साजरा : सोशल मिडियावरही शुभेच्छा, कोरोनाला रोखण्यासाठी प्रार्थना
जळगाव : शहर आणि परिसरात ईद उत्साहात आणि परस्परांना शुभेच्छा देऊन साजरी करण्यात आली. ईदनिमित्त यंदा प्रथमच घरोघरी नमाज अदा करण्यात आले.
यावर्षी कोरोनाचे सावट सर्वच सणांवर आल्यामुळे घरच्याघरीच सर्व सण साजरे करण्यात यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यानुसार सर्वच समाजबांधवांनी त्यांचे सण घरोघरीच साजरे करणे पसंद केले. रमजानच्या काळातही प्रशासनाने घरच्या घरीच नमाज अदा करावी, अशी विनंती केली होती. तसेच सामाजिक संघटनांनीही याबाबत आवाहन केले होते. त्याचा मान राखून अन् प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करून ईद साजरी करणे पसंत केले. यावर्षी पारंपारिक खरेदीलाही फाटा देण्यात आला. उलट, केवळ खाण्याच्या पदार्थांचीच खरेदी करण्यात आली. कपडे, चप्पल तसेच अन्य वस्तू खरेदी न करता सामाजिक उपक्रमांसाठी रक्कम दिली. गर्दी टाळण्यासाठी परस्परांना सोशल मिडियावरून शुभेच्छा देण्यात आल्या.
लहान बालकं, जेव्हा मनानं मोठी होतात
लॉकडाउनमुळे आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी यंदा घरीच नमाज पडून ईद साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी प्रशासनाच्या अटींचे तंतोतंत पालन करत ईद साजरी केली. मात्र या काळात तीन भावंडांनी वर्षभरात नातेवाईकांनी दिलेले पैसे साठवून ते गोरगरिबांना धान्य वाटप करण्यासाठी जळगाव जिल्हा मणियार बिरादरीकडे सुपूर्द केले.
हंजला, हमजा, तलहा ही तिन्ही भावंडे ८ ते १२ वर्षे वयोगटातील! पण या तिन्ही बालकांनी वयापेक्षा कितीतरी पटीने मोठा विचार करत समाजासाठी आपला खारीचा वाटा उचलला. ही तिन्ही मुले अँग्लो उर्दू हायस्कूलमधील शिक्षक तय्यब शेख इब्राहिम यांची मुले आहेत.
लॉकडाउनमुळे गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झालाय, ही बातमी या चिमुकल्या भावंडांपर्यंत पोहोचली अन् त्यांनी ईदच्या निमित्ताने आपल्याकडे जमलेले सर्व पैसे या कार्यासाठी देण्याचा विचार केला. या तिघांनीही जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख ,संचालक सलीम मोहम्मद व यूसुफ अहमद यांच्या स्वाधीन केले व या पैशातून आपण गरिबांना जे रेशन कीट उपलब्ध करून देत आहात, त्यासाठी या पैशांचा वापर करावा, असे सुचवले.
लहान मुलांमध्ये मोठ्यांनाही लाजवेल अशी आलेली समज पाहून या साऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.