यंदा दांडियाशिवाय नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 10:19 PM2020-10-06T22:19:39+5:302020-10-06T22:19:46+5:30

तरुणाईचा हिरमोड : कोरोनामुळे साधेपणाने होणार केवळ पुजाविधी

This year Navratri festival without Dandiya | यंदा दांडियाशिवाय नवरात्रोत्सव

यंदा दांडियाशिवाय नवरात्रोत्सव

Next


मुक्ताईनगर : दरवर्षी अतिशय धुमधडाक्यात साजरा होणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यामुळे भाविकाचा, विशेषत: गरबा नृत्य करणाऱ्या तरुण आणि तरुणींचा हिरमोड झाला आहे. तालुक्यातील देवींचे विविध मंदिरे देखील केवळ दर्शना पुरतेच उघडे राहणार आहेत.
दरवर्षी मुक्ताईनगर तालुक्यात नोंदणीकृत जवळपास ६० व नोंदणी नसलेले ३० ते ४० अशा जवळपास शंभर मंडळांद्वारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाच्या दरम्यान धार्मिक पूजा विधी व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे गरबा नृत्य व त्यासाठी तरुणाई सजलेली असते. परंतु या वर्षी तरुणाईला नवरात्र उत्सवामध्ये गरब्याच्या नृत्यास मुकावे लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा न करता अतिशय साध्या पद्धतीने पूजा विधी आटोपून नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मुक्ताईनगर शहरात मुख्य उत्सव हा जुन्या व नवीन रेणुका मंदिरात केला जातो. त्यानंतर जवळपास चार ठिकाणी शहरात दुर्गा मंडळे हे देवीची स्थापना करीत असतात. रेणुका मंदिरात यावर्षी केवळ पूजाविधी कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच भाविकांना देखील केवळ दर्शनासाठी प्रवेश मिळणार असून त्यातही सोशल डिस्टंसिंग मास्क आणि सॅनीटायझरचा उपयोग करण्यात येणार आहे. हीच स्थिती नवीन रेणुका मंदिरात देखील असून शहरातील चारही दुर्गा मंडळाच्या ठिकाणी या नियमांचे पालन करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कोथळी जवळील आशापुरा देवीचे मंदिर, हरताळा फाट्यावरील संतोषी माताचे मंदिर, चारठाणा येथील भवानी मंदिर, माळेगाव वनविभागाच्या हद्दीतील कालिंका मंदिर यासह मध्यप्रदेशातील इच्छापुर येथील इच्छा देवीचे मंदिर हे प्राधान्याने श्रद्धा स्थाने आहेत. यापैकी इच्छापूर मध्य प्रदेश येथे अतिशय धूमधडाक्यात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मध्य प्रदेश व महाराष्ट्रच्या विविध जिल्ह्यांमधून लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी भेटी देतात व देवीचे दर्शन घेतात. यावर्षी मात्र सोशल डिस्टंसिंग पाळावे लागणार असले तरी इच्छापुरच्या देवीच्या मंदिरात प्रवेशासंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात जवळपास शंभर देवीची मंडळे स्थापन होत असली तरी या वर्षी अद्यापही मुक्ताईनगर पोलिसांकडे कोणत्याही मंडळांची नोंदणी झालेली नाही. तरी देखील जवळपास पन्नास ते साठ मंडळांची नोंदणी अपेक्षित असल्याची माहिती गोपनीय कक्षाचे गणेश चौधरी व अविनाश पाटील यांनी दिली.

Web Title: This year Navratri festival without Dandiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.