यंदा वहनोत्सवात ना पानसुपारी ना भारुडांची रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:16 AM2020-12-31T04:16:23+5:302020-12-31T04:16:23+5:30
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित वहनोत्सव यंदा झाला खरा, मात्र कोरोनामुळे परवानगीअभावी ग्रामप्रदक्षिना होऊ ...
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने आयोजित वहनोत्सव यंदा झाला खरा, मात्र कोरोनामुळे परवानगीअभावी ग्रामप्रदक्षिना होऊ शकली नाही. दरवर्षी असणारा पानसुपारीचा कार्यक्रम व भारुडांचीही रंगत यंदा शहरवासीयांना अनुभवता आली नाही. मात्र परंपरा अखंडित राहण्यासाठी मंदिर परिसरातच वहन काढण्यात आले.
तीनशे वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाला आहे. हा वहनोत्सव म्हणजे जळगावकरांसाठी धार्मिकतेसह सांस्कृतिक मेजवाणीही असते. कारण काय तर या उत्सवात भाविकांकडून ठिकठिकाणी होणारी पूजा-अर्चा व या सोबतच लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या भारुडांचे यात सादरीकरण केेले जाते. यंदा मात्र या धार्मिक व सांस्कृतिक मेजवानीला जळगावकर मुकले ते केवळ अख्ख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना संसर्गामुळे. इतकेच नव्हे यंदा प्रथमच याच कोरोनामुळे वहनाच्या ग्रामप्रदक्षिणेत खंड पडला.
१८ पगड जाती जमातींना एकत्र करून सद्गुरू श्री संत अप्पा महाराज यांनी शके १७९४ (सन १८७२) मध्ये सुरू केलेला रथोत्सव म्हणजे श्रीराम मंदिर संस्थानचा सर्वोच्च मानबिंदूच. संस्थानतर्फे साजरा होणाऱ्या श्रीराम रथोत्सवाचे वेध लागतात ते वहनोत्सवापासून.
काकडारती व पूजा अभिषेकाची अनोखी परंपरा
पहाटे ५ ते ७ या वेळेत काकडा आरती, पूजा, अभिषेक, मंगलारती होऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ व सामूहिक रामजप केला जातो. त्यानंतर निमखेडी शिवारातील श्रीराम मंदिर येथे पालखी जाते व गिरणा नदीच्या पात्रात प्रभू श्रीराम यांच्या उत्सव मूर्तीस व श्रीसंत मुक्ताबाईंच्या पादुकांना जलाभिषेक व पूजन करण्यात येते. तसेच श्रीरामांच्या आरतीने वहनाला प्रारंभ होतो. मात्र यंदा पहाटेपासूनचा हा धार्मिक मेळा अनुभवता आला नाही.
रांगोळ्या, सडासमार्जन दिसलेच नाही
घरी वहन येणार, आपल्या हातून आरती होणार हीच खरी दिवाळी असल्याची भावना कुटुंबामध्ये दरवर्षी असते. यासाठी पानसुपारीला मोठे महत्त्व असते. दरवर्षी वेगवेगळे यजमान पानसुपारी मान स्वीकारतात. विशेष म्हणजे यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला जातो. या निमित्ताने परिसरात रांगोळ्या, सडासमार्जन करून परिसर स्वच्छ करण्यात येतो. या निमित्ताने दोन दिवसांपासून कुटुंबात अतिशय उत्साहाचे वातावरण असते व त्यासाठीची तयारी, शेजारच्यांना निमंत्रण, मित्र परिवारास निमंत्रण अशी प्रक्रिया आठवड्यापासून सुरू असते. मात्र यंदा वहन मंदिर परिसरात फिरविण्यात आल्याने हा सोहळ्यापासून भाविक वंचित राहिले.
संबळ, मृदुंग, नाल, टाळ, पेटी शांत-शांत
श्रीराम मंदिर संस्थान मंदिराला लाभलेला धार्मिक व सांस्कृतिक वारसा हा अतिप्राचीन आहे. रथोत्सवाचे वारे वाहू लागले की त्या दरम्यान राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधील सहभागीतांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. काकड आरती, भजने, तुळशीची आरती व त्यानंतर सुरू होते ती सायंकाळची धावपळ. सायंकाळी निघणारे वहन म्हणजे उत्साहाला पारावार रहात नाही आणि यात सादर होणारे भारुड तर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. संबळ, मृदुंग, नाल, टाळ आणि पेटी असे भारुड सादर करणाऱ्या मंडळींचे वाद्य. गवळ, नंतर भारूड अशा लोककलेचे हे सादरीकरण मोठी दाद मिळविणारे ठरते. मात्र यंदा ना भजन झाले ना वाद्यांचा निनाद घुमला.
आत्मिक समाधान राहिले दूर
घरी वहन यावे अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा असते. त्यानुसार मंदिरात भेट देऊन विनंती केली जाते. त्यानंतर यजमानांकडे वहन जाते व कुटुंबियांसाठी ती दिवाळी असते. एक आत्मिक समाधान, ईश्वर सेवेचा आनंद यातून कुटुंबियांना मिळतो. मात्र हे सर्व यंदा दूरच राहिले.