यंदा होणार फक्त `येशूं`च्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:58+5:302020-12-22T04:15:58+5:30
जळगाव : दरवर्षी शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांतर्फे मोठ्या उत्साहाने प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे शासनाच्या ...
जळगाव : दरवर्षी शहरातील विविध चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांतर्फे मोठ्या उत्साहाने प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे शासनाच्या सुचनेनुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, नाताळच्या दिवशी फक्त प्रभू `येशूं`चा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शहरातील विविध चर्चतर्फे देण्यात आली.
शहरातील रामानंद नगर परिसरातील सेंट फ्रान्सिस डी सेल्स चर्च, मेहरुण येथील थॉमस् चर्च व पांडे डेअरी चौकातील सेंट अलायन्स चर्च या ख्रिश्चन बांधवांचे चर्च आहेत. दरवर्षी या ठिकाणी नाताळच्या अगोदरच प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. यामध्ये नाताळ गाणे, कॅरल पार्टी, ख्रिस्त जन्माचे देखावे, गॅदरींग, तसेच इतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते; मात्र यंदा कोरोनामुळे शहरातील तिन्ही चर्चमध्ये हे कार्यक्रम रद्द केले आहेत. नाताळनिमित्त चर्चवर विद्युत रोषणाई करीत फक्त येशूचा जन्मोत्सव व प्रार्थना करण्यात येणार आहे. जन्मोत्सव कार्यक्रमावेळी फक्त ५० जणांनाच परवानगी देणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच साध्या पद्धतीने जन्मोत्सव :
नाताळ अर्थात प्रभू येशूचा जन्मोत्सव म्हणजे ख्रिश्चन बांधवांसाठी दिवाळीसारखा सण असतो. आठवडाभर घरोघरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा देण्यासह चर्चमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. घरात गोड खाद्यपदार्थ केले जातात; मात्र यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. नाताळच्या आदल्या दिवशी येशूंचा जन्मोत्सव तर दुसऱ्या नाताळच्या दिवशी २५ डिसेंबरला प्रभू येशूंची उपासन व प्रार्थना करण्यात येणार आहे.