यंदा ई- मतपत्रिकांद्वारे सर्व्हीस व्होटर करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:19 PM2019-04-17T13:19:58+5:302019-04-17T13:20:26+5:30
इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा वापर
जळगाव : लोकसभा निवडणुकीत सैन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना यंदा टपाली मतदानाऐवजी आॅनलाईनपद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात येऊन मतदान होणार असून जळगाव जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाली आहे. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) होणाºया या मतदान पद्धतीसाठी सात हजार ९९२ मतदार असून त्यांना आॅनलाईन मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
नोकरीनिमित्त अथवा निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदान पद्धतीने मतदान मागविले जाते.
यंदा सैन्यातील अधिकारी, कर्मचारी (सर्व्हीस व्होटर) यांच्यासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित केली असून जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर दोन्ही मतदार संघातील या मतदारांना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
मतदान कर्मचाºयांसाठी टपाली मतदानाची सोय
मतदानाच्या दिवशी अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असतात. त्यामुळे त्यांना पूर्वीप्रमाणेच टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ते मतदानाच्या दिवशी मतदान करुन टपालाद्वारे मतपत्रिका पाठवू शकतात अथवा प्रशिक्षणादरम्यानही मतदान करु शकतात, अशी सोय जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने करण्यात आली आहे.
काय आहे ईटीपीबीएस प्रणाली
पूर्वी सैन्यातील अधिकारी, कर्मचाºयांना मतदानासाठी टपालाने मतपत्रिका पाठवून टपालाद्वारेच मागविली जात असे. मात्र आता इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) या मतदारांचे मतदान करुन घेतले जात आहे. यात आता संबंधित मतदारांच्या मतपत्रिका ई-मेलद्वारे अधिकारी, कर्मचारी कार्यरत असलेल्या ठिकाणी पाठविल्या जातात. त्या ठिकाणी मतदार या मतपत्रिका डाऊनलोड करून त्यावर मत देऊन त्या पत्रिका टपालाद्वारे परत पाठवितात.
बारकोडद्वारे खात्री
आॅनलाईनपद्धतीने पाठविलेल्या मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी बारकोडचा वापर केला जातो. जेणेकरुन संबंधित मतदाराद्वारेच हे मतदान झाले पाहिजे व मतमोजणीवेळी त्याची खात्री केली जाते.
मतपत्रिका रवाना
जळगाव लोकसभा मतदार संघात ६ हजार ८४० सर्व्हीस व्होटर असून रावेर लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ असे मतदार आहेत. दोन्ही मतदार संघातील या एकूण ७ हजार ९९२ सर्व्हीस व्होटर्सना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्या परत येण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने देण्यात आली.