यंदाची ‘ईद’ची इतिहासात नोंद होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 03:48 PM2020-05-24T15:48:23+5:302020-05-24T15:49:51+5:30
एरव्ही ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी केली जाणार आहे.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : इतिहासामध्ये कधीही रमजान ईदला नवीन कपडे परिधान न करता, गळा भेट न घेता तसेच ईदची सामूहिक नमाज ईदगाह मैदानावर न करता इतिहासात अशी एक कधी साजरी झाली नाही. मात्र यंदाची ईद साजरी होणार आहे. यापूर्वी कधीही अशी साजरी झाली नाही याची इतिहासात नोंद होणार आहे. एरव्ही ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने घरीच ईद साजरी केली जाणार आहे.
रमजानच्या शेवटच्या पर्वात मुस्लीम समाज बांधवांतर्फे बाजारपेठ नवीन कपडे, बूट ,चप्पल, पंजाबी ड्रेस, पठाणी ड्रेस, नेहरू शर्ट-पायजमा, महिलांसाठी सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्यासाठी अत्यंत वर्दळ असते. याद्वारे कोट्यवधींची उलाढाल दरवर्षी बाजारपेठेत होत असते. पण यंदा अगदी ईदच्या पूर्वसंध्येपर्यंत बाजारामध्ये कुठलीही रेलचेल दिसून आली नाही. मुस्लीम समाज बांधवांनी अत्यंत साध्या पद्धतीने जुन्या कपड्यांवर घरीच ईद साजरी करणार असल्याचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. ईदचा खर्च न करता या पैशातून बेरोजगार, हातावरचे पोट भरणारे तसेच पायी भटकंती करणाऱ्या लोकांची मदत करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
शिरखुर्म्याचा आस्वादही यंदा फिका
ईद म्हटली की ड्रायफूटद्वारे तयार करण्यात आला शिरखुर्मा आलाच. सर्व समाज बांधवांना आग्रहाने शिरखुर्म्यासाठी आमंत्रित केले जाते. मात्र यंदा फक्त लहान मुलांच्या आग्रहाखातर गृहिणींनी थोड्या फार प्रमाणात सुकामेवा, ड्रायफूट बाजारातून खरेदी केली. दरवर्षी मोठ्या उत्साहात शिरखुर्माची जयत तयारी केली जाते. मात्र यंदा शीरखुर्म्यासाठी सेवया, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, शुद्ध घी, आक्रोड यांची पाहिजे त्या प्रमाणात खरेदी झालेले नाही. तसेच नवीन टोपी, अत्तर, सुरमा या वस्तूही नेहमीच्या तुलनेत विक्री झालेली आहे.