"होय ती ऑडिओ क्लीप माझीच", शिंदेंच्या आमदाराची पत्रकाराला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 09:45 AM2023-08-06T09:45:54+5:302023-08-06T09:51:52+5:30
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला मिळत आहे
जळगाव - शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते आणि पाचोऱ्याचे शिवसेना आमदारकिशोर पाटील यांनी पत्रकाराला शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे या क्लीपबद्दल त्यांना विचारला असता, होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही, असे म्हणत आपण पत्रकाराला का शिवीगाळ केली हे त्यांनी सांगितले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील एका स्थानिक पत्रकाराला शिवीगाळ करताना ऐकायला मिळत आहे. तसेच घरी येऊन मारहाण करु, अशी धमकी देखील देत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते. जळगाव जिल्हा सध्या एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणावरुन हादरला आहे. या प्रकरणावरुन एका स्थानिक पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांना ही टीका पचनी न पडल्याने त्यांनी पत्रकाराला थेट शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
''होय, मी शिव्या दिल्या. पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे. समोर आलेली ऑडिओ क्लिप माझीच आहे. मी मान्य करतो. मी माझे शब्द मागे घेणार नाही''. या शिवीगाळमागील कारणही तसंच आहे, असे म्हणत आमदार पाटील यांनी आपली बाजू माध्यमांसमोर सांगितली.
जळगावमधील गरीब कुटुंबावर आघात झालाय, ज्यांची सात वर्षाची चिमुकली गेलीय, तिच्या आई-वडिलांचं सांत्वन करावं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अंतिम आठवडा प्रस्ताव असताना, प्रचंड धावपळ असतानाही सगळे विषय बाजूला काढून त्या आई-वडिलांशी संवाद साधत तब्बल चार मिनिटे सांत्वन केलं. त्यांना सांगितलं की, माझी मुलगी आहे, असं समजून मी या प्रकरणावर कारवाई करेन. असं असताना एखादा पत्रकार, तोही विकृत होता का ते मला माहिती नाही. असा एखादा पत्रकार या घटनेला मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी असं संबोधतो. इतकी संवेदनशील घटना असताना, मुख्यमंत्री चमकोगिरी करतात, अशाप्रकारची बातमी करु शकतो?'', असे म्हणत आमदार पाटील यांनी घटनाक्रम सांगितला.