५५० कोरोना रुग्णांच्या जीवनात योगामुळे उजाळली आरोग्यमय पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:27+5:302021-06-21T04:12:27+5:30
जागतिक योग दिन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनात ॲलोपॅथी औषधांसोबतच योगाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून ऑक्सिजनवर असलेल्या ...
जागतिक योग दिन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनात ॲलोपॅथी औषधांसोबतच योगाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून ऑक्सिजनवर असलेल्या व ऑक्सिजनचा पुरवठा करावा न लागलेल्या अशा दोनही रुग्णांना योगा केल्याने फायदा झाल्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात मोहाडी रुग्णालयात नियमित योगाचे वर्ग घेतले जात होते. येथील बरे झालेल्या ५५० रुग्णांमधून पोस्ट कोविडची एकही तक्रार समोर आली नाही. तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर श्वासाच्या व्यायामाशिवाय पर्याय नाही, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
२१ जून हा सर्वत्र योग दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना जिल्ह्यातही दीड लाखाच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोराना हा फुफ्फुसांवर आघात करणारा विषाणू आहे. यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यात फुफ्फसाच्या व्यायामांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. यात योगामुळे रुग्ण बरे होण्यात, त्यांची पुढील गुंतागुंत रोखण्यास मदत झाल्याचे डॉक्टर सांगतात. याबाबत स्वतंत्र अभ्यास नसला तरी या श्वसनाच्या व्यायामामुळेच लोकांची फुफ्फुसांची ताकद वाढली, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
हे ठरते फायदेशीर
कोविडच्या काळात प्राणायाममध्ये भस्त्रिका, अनुलोमविलोम असे श्वासाचे व्यायाम अधिक फायदेशीर ठरतात. सामान्यांनीही ते नियमित करावे. यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढते. कोविडमध्ये याचे चांगले परिणाम समोर आले आहेत. मोहाडीतील योग शिबिरांमुळे रुग्णांना याचा फायदा झाला, या ठिकाणी बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे आयुर्वेद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. मिलिंद कांबळे सांगतात.
कोट
कोविड काळात भस्त्रिका, अनुलोम, विलोम, सूर्यनमस्काराचा अभ्यास, भुजंगासहन, पुष्ठासहन हे उपयुक्त ठरतात. यासह कपालभाती व जलनेतीचा अभ्यास फायदेशीर ठरतो, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जलनेतीचा अभ्यास अत्यंत उपयुक्त आहे. याने नियमित होणारे सर्दी, खोकला यांचेही त्रास कमी होतात. - डॉ. देवानंद सोनार, संचालक सोहम विभाग योगा ॲन्ड नॅचरोथेरीपी मू. जे. महाविद्यालय
कोट
योगानेच कोरोनात अधिक फायदा झाला आहे. केवळ शारीरिक नाही तर मानसिक तणावातून योगामुळे रुग्ण बाहेर पडले आहेत. यासह ध्यानधारणा, प्राणायम अतिशय उपयुक्त ठरले. शुद्धीक्रियेत कपालभाती, जलनेती अधिक प्रभावी ठरल्या आहे. ज्या रुग्णांनी योगा केला त्यांना याचा फायदा झाला. - डॉ. पंकज खासबागे, सहाय्यक प्राध्यापक सोहम विभाग योगा ॲन्ड नॅचरोथेरपी मू. जे. महाविद्यालय
श्वसनच्या व्यायामाशिवाय पर्याय नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आपण श्वासाचे व्यायाम करायला सांगतो. औषधोपचाराबरोबच रेस्पिरेटर या माध्यमातून असो किंवा फुगा फुगविणे असो या माध्यमातून श्वासाचे व्यायाम केले जातात. श्वासाचे व्यायाम अर्थातच योगा होय तुम्हाला फुफ्फुसांची कार्यक्षमता चांगली ठेवायची असेल तर याशिवाय पर्यायच नसल्याचे औषध वैद्यकशास्त्रविभागाचे डॉ. भाऊराव नाखले सांगतात. किती लोकांना फायदा झाला याबाबत संशोधन झाले नसले तरी पोस्ट कोविडच्या तक्रारी कमी येणे हे त्याचेच परिणाम आहेत.