सकल लेवा महिला मंडळातर्फे योग शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:12 AM2021-06-21T04:12:29+5:302021-06-21T04:12:29+5:30
रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांना समन्स जळगाव : अनलॉक नंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत व्यवसाय करण्यास ...
रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांना समन्स
जळगाव : अनलॉक नंतर जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. असे असतांना रेल्वे स्टेशन परिसरात अनेक व्यावयायिक रात्री १० पर्यंत दुकाने उघडी ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने, पोलिसांतर्फे या व्यावसायिकांना शनिवारी रात्री समन्स बजाविण्यात आले. रात्री नऊ नंतर दुकाने उघडी दिसल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
भाजीपाला विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी
जळगाव : कोर्ट चौकातून चित्रा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोलाणी मार्केटला लागून रस्त्यालगत दोन्ही बाजूला भाजीपाला, फळे व खाद्य विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरेदीसाठी येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करत असल्यामुळे, या कोंडीत अधिकच भर पडत आहे. यामुळे पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
उघड्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : शहरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत विविध खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या हातगाड्या थाटल्या आहेत. यातील बहुतांश विक्रेते हे उघड्यावरच अन्न पदार्थ विक्री करत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने, या उघड्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने उघड्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधुन केली जात आहे.
गल्ली-बोळीत साचले कचऱ्यांचे ढीग
जळगाव : नवीपेठ, टॉवर चौक, रेल्वे स्टेशन परिसर या भागात अनियमित साफसफाईमुळे गल्ली-बोळीत मोठ्या प्रमाणावर कचऱ्यांचे ढीग साचले आहेत. यामुळे ऐन पावसाळ्यात साथीचे आजार निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याची व जंतूनाशक औषधांची फवारणी करण्याची मागणी येथील व्यावसायिक व रहिवाशांमधुन केली जात आहे.