योग : आनंदी जीवनाचा राजमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:04 PM2019-06-21T13:04:38+5:302019-06-21T13:05:19+5:30

योगासन व प्राणायाम हा भारतीय वारसा

Yoga: Highway of happy life | योग : आनंदी जीवनाचा राजमार्ग

योग : आनंदी जीवनाचा राजमार्ग

googlenewsNext

जळगाव : योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो आणि आजार, विकारांचे निवारण होण्यास खूप मदत होते. एक प्रकारे आनंदी जीवनाचा राज मार्ग म्हणजे योगा आहे. अख्या जगानेही स्वीकारलेल्या या विद्येचा आपल्या देशातही अधिकाधिक प्रचार, प्रसार होऊन सर्वांना निरामयी आरोग्य जगता येईल, असा विश्वास योग दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वीची ही योगसाधना म्हणजे पतंजली ऋषींनी जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. योगसाधनेची आठ अंगे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी. योगसाधनेने शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक या चार स्तरावर समतोल विकास होतो, असा सल्ला योग तज्ज्ञांकडून दिला जात आहे. योग दिनानिमित्त घेतलेला हा आढावा....
सूर्यनमस्कार
भारतभूमीने जगाला दिलेल्या मौलिक देणग्यांमध्ये योगविद्या, ओंकारसाधना आणि सूर्यनमस्कार यांचा समावेश आहे. पायाच्या टाचेपासून तर मानेच्या मणक्यापर्यंत व श्वसनविषयक हा व्यायाम अनेक शतकांपासून साधकांचा प्रिय व्यायाम प्रकार राहिला आहे. सूर्यनमस्कारात जानुभालासन, अर्धभुजंगासन, अष्टांगासन, सरलहस्त भुजासन, अधोमुख श्वासासन यांचा समावेश आहे. सूर्यनमस्कार घालताना सूर्यदेवतेची नावे मोठ्याने उच्चारताना ‘रकारान्त’ बाराखडी ही मंत्रसामर्थ्य व शक्तीप्रदान करणारी ठरते.
ओंकार साधनेचे फायदे
दीर्घ श्वसनामुळे फुफ्फुसे कार्यक्षम राहातात, रक्ताभिसरण वाढून शरीराला अधिक प्राणवायू मिळतो, त्यामुळे प्रसन्नता, उत्साहवृद्धी होते. रक्तदाब नियंत्रणात राहातो. निद्रानाश दूर होतो. स्मृतिसंवर्धन होते. स्वरयंत्रावर चांगला परिणाम होतो. विशेषत: स्वरसौंदर्य वाढण्यास मदत होते. शास्त्रीय गायक-गायिकाही ओंकारसाधनेद्वारे आपल्या आवाजाची गुणवत्ता वाढवतात, असे योगतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रोग प्रतिबंधात्मक उपाय
योग ही शांती, समाधान, आनंद देणारी साधना असून त्यामुळे निरोगी जीवन जगता येऊ शकते. रोग झाल्यावर योग करण्यापेक्षा रोग होऊच नये यासाठी योग करावा. म्हणजेच योग हा रोग प्रतिबंधात्मक उपायच असल्याचा सल्लाही दिला जात आहे.
शारीरिक, मानसिक विकासासाठी सोपा उपाय
२१ जून आज जागतिक योग दिवस. शारीरिक व मानसिक विकासासाठी योगासन हा एकच उत्तम व बिनखर्चिक उपाय आहे. तसेच योग ही एक जीवन शैली असून दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग केला तर स्वत:सह सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होईल. शालेय शिक्षणातही योगाचा समावेश झाल्यास मुलांना लहान पणापासूनच त्याचे महत्त्व समजेल, ते जागृत होतील. योगामध्ये आता करिअरच्या वाटादेखील निर्माण झाल्या असून इतर क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना विद्यार्थ्यांना यामध्ये चांगली संधी आहे, अशी माहिती योग दिनानिमित्त दिली जात आहे.
लहान वयापासूनच योगाची सुरुवात व्हावी
आधुनिक जीवन शैलीत निरोगी आरोग्यासाठी योग अभ्यास आवश्यक आहे. यामुळे मानसिक, शारीरिक व्याधी दूर होतात. लहान वयापासूनच याची सुरुवात झाली पाहिजे, असा सूरही उमटत आहे.
निरामयी जीवनाचा मंत्र....
- रोज श्वसन, प्राणायाम, आसन, सूर्यनमस्कार व पूरक हालचाली असा व्यायाम करा
- अनेक योगासनांचा संगम म्हणजे सर्वांगसुंदर व्यायाम.
- योग एक जीवन शैली आहे, तिचा उपयोग करा.
- योग प्राचीन शास्त्र असून यामुळे आनंदी जीवन जगता येते.

योग ही शांती, समाधान, आनंद देणारी साधना असून त्यामुळे निरोगी जीवन जगता येऊ शकते. योग ही अवघ्या विश्वाला भारतीय संस्कृतीने दिलेली देणगी आहे. तिची जोपासना झाली पाहिजे. त्यासाठी जनाजनात व मनामनात योग रुजविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
- प्रा. आरती गोरे, संचालक, सोहम् डिपार्टमेंट आॅफ योग अ‍ॅण्ड नॅचरोपॅथी, मू.जे. महाविद्यालय.

Web Title: Yoga: Highway of happy life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव