‘शहा-शहंशाह’कडून देशाच्या एकात्मतेला सुरुंग - सीएए, एनआरसीवरुन योगेंद्र यादव यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 01:12 PM2020-02-09T13:12:50+5:302020-02-09T13:13:05+5:30

सत्ताधाऱ्यांविरुद्ध एकजुटीची मूठ आवळण्याचे यांचे आवाहन

Yogendra Yadav criticizes CAA, NRC for 'integration of country' | ‘शहा-शहंशाह’कडून देशाच्या एकात्मतेला सुरुंग - सीएए, एनआरसीवरुन योगेंद्र यादव यांची टीका

‘शहा-शहंशाह’कडून देशाच्या एकात्मतेला सुरुंग - सीएए, एनआरसीवरुन योगेंद्र यादव यांची टीका

Next

जळगाव : सीएए व एनआरसी सारखे कायदे आणून जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करीत असून देशात वाद उफाळू पाहत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून राज्य करणे या इंग्रजांच्या तत्वाचाच अवलंब हे सरकार करीत आहे. त्यासाठी या सरकारने न्याय संस्था असो की माध्यमे असो त्यांना आपल्या हातचे बाहुले बनविले आहे. असे असले तरी देश वाचविण्यासाठी आता जनताच रस्त्यावर येत असून सरकारच्या या धोरणाविरुद्ध आम्ही लढा देऊ व ते देश तोडत असले तरी आम्ही देश जोडायचे काम करू असा निर्धार स्वराज्य अभियानाचे प्रणेते, राजकीय विचारवंत, कृषी चळवळीचे मार्गदशक योगेंद्र यादव यांनी जळगावात केला. या वेळी ‘लढेंगे..... जितेंगे’, ‘वो तोडेंगे... हम जोडेंगे’, अशा गगनभेदी घोषणा देत सीएए, एनआरसीला विरोध करण्याचा ठराव करण्यात आला.
सीएए व एनआरसी कायद्याच्या विरोधात संविधान बचाव कृती समितीतर्फे शनिवारी जळगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी मार्गदर्शन करताना यादव बोलत होते.
या वेळी संविधान बचाव कृती समितीच्या संयोजिका प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, मौलाना अतिर्कुर रहेमान, ग्यानी बरकतसिंग, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे उपस्थित होते.
मेणबत्ती प्रज्वलीत करून व मौलाना अतिर्कुर रहेमान यांच्या शांतीच्या संदेशाने सभेला सुरुवात झाली.
...तर आपले वारस विदेशात असतील
आज मी या कायद्यासाठी वेगवेगळ््या ठिकाणी जात आहे. ते तुमच्यासाठी नाही तर मुले, मातृभूमी आणि संविधान वाचविण्यासाठी जात आहे व येथेही त्यासाठीच आलो आहे. कारण हे कायदे आणून सरकार माझ्यासह तुमच्या मुलांना देशातून हाकलू पाहत आहे. त्यामुळे कदाचित आपले मुले, नातवांना इस्त्रायलसारख्या कोणत्या देशात जावे लागू शकते. त्यावेळी ते आपल्याच जाब विचारतील तुम्ही हा कायदा झाला त्या वेळी काय करीत होता. ही वेळ येऊ नये म्हणून आताच सर्वांनी जागृत होणे गरजेचे असून या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी दोन महिने जागावे लागणार असून तशी तयारी ठेवा, असे आवाहनही यादव यांनी केले.
देशात १०० पेक्षा जास्त शाहीन बाग
सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधात महिलाच बाहेर पडल्या असून ज्या वेळी डोक्यावरून पाणी जाते त्या वेळीच महिला घराबाहेर पडते, असे सांगत या आंदोलनाची तीव्रता यादव यांनी याद्वारे सांगितली. दिल्लीतील शाहीन बाग येथे या कायद्याविरुद्ध महिला लढा देत असून देशात असे १०० पेक्षा जास्त ‘शाहीन बाग’ आता होऊ पाहत आहे. जे काम मोठ-मोठ्या रॅली करू शकल्या नाही ते काम शाहीन बाग आंदोलनाने होत असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
मोदी-शहांना चिमटा
मोदी-शहा यांनी असे कायदे आणून फूट पाडण्याचा प्रयत्न केला असला तरी या निमित्ताने सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले व तिरंगा हाती घेऊन लढा देत आहे. यासाठी सर्वांनी मोदी-शहा यांना धन्यवाद दिले पाहिजे, असा चिमटा यादव यांनी काढला.
सर्वोच्च पदावरील व्यक्तींकडून देशाला धोका
आज देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीच देश तोडण्याचे काम करीत आहे, याचेच वाईट वाटते, अशी खंत यादव यांनी या वेळी व्यक्त केली.

कायद्याचे परिणाम सांगताच सर्व जण स्तब्ध
सभेदरम्यान यादव यांनी सीएए व एनआरसीमध्ये सरकारने काय तरतुदी केल्या आहे व त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, याचे सर्व टप्पे सांगितले. त्या वेळी त्याची गांभीर्यता व परिणाम ऐकून सभा स्थळ स्तब्ध झाले होते.
एनपीआरला विरोध करा
१ एप्रिलपासून देशात सर्वत्र प्रत्येक व्यक्तीची माहिती संकलित करणे सुरू होणार आहे. यात एनपीआरचा पहिला टप्पा राहणार असून त्यात अगोदर सर्व माहिती मागून त्याची नोंद केली जाणार आहे. त्यासाठी माहिती देऊ नका व या एनपीआरला विरोध करा, असे आवाहन यादव यांनी केले.
राज्य सरकारवरही विश्वास ठेवू नका
अनेक राज्ये हे कायदे लागू होऊ देणार नाही, असे म्हणत आहे. मात्र त्यावर विश्वास न ठेवता तसा विधानसभेत ठराव करायला सांगा व राज्य सरकारचे कोणतेही कर्मचारी १ एप्रिलपासून माहिती संकलनाचे काम करणार नाही, असे धोरण ठरवायला सांगा, असे आवाहनही यादव यांनी केले.
देशभर ‘देश जोडो मोहीम’
या कायद्यावर बहिष्कार टाकण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून २२ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान देश जोडो मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा यादव यांनी केली.
आमच्याजवळ मातृभूमी आहे...
यादव यांनी या वेळी ‘दिवार’ चित्रपटातील संवाद सांगत, आज सत्ताधाऱ्यांकडे सत्ता आहे, खुर्ची आहे सर्व काही असले तरी आमच्या जवळ मातृभूमी आहे, असे म्हणताच टाळ््यांचा कडकडाट झाला.
घोषणांनी दणाणला परिसर
या वेळी लढेंगे, जितेंगे, वो तोडेंगे, हम जोडेंगे, इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणला होता.
उमर खालीद यांची चित्रफित
विद्यार्थी नेता उमर खालीद यांना परवानगी नाकारल्याने ते सभेला येऊ शकले नाही. त्यामुळे सभास्थळी त्यांची चित्रफित दाखविण्यात आली. या लढाईसाठी मी जळगावात नक्की येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विनोद देशमुख यांनी बंधूभावाला जो कायदा ठेव पोहचलवेल, तो कायदा आम्ही मान्य करणार नाही, असा उल्लेख आपल्या भाषणात केला.
पोलीस प्रशासन दबावाला घाबरले व सभेला परवानगी नाकारल्याची टीका मुकुंद सपकाळे यांनी करीत या कायद्याला कडाडून विरोध करण्याचे आवाहन केले. जीव गेला तरी संविधान वाचविण्यासाठी लढा सुरूच राहील, असे नगरसेवक इब्राहीम पटेल म्हणाले. देशात आज भाडेकरूच आम्हाला पुरावा मागत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांनी केली. ही काळ््या इंग्रजांविरुद्ध आहे, अशी टीका इकरा शिक्षण संस्थेचे करीम सालार यांनी केली.
मार्च अखेर उमर खालेद यांची जळगावात सभा
प्रतिभा शिंदे यांनी आपल्या भाषणात या कायद्यामुळे होणारे परिणाम सांगून सभेला परवानगी न मिळण्यासाठी प्रयत्न केलेल्या जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर टीका केली. मात्र मार्च अखेर पर्यंत उमर खालेद, जिग्नेश मेवानी व कन्हैया कुमार यांच्या जळगावात सभा होईल, अशी घोषणा केली.
महिलांना प्रवेश दिल्याबद्दल कौतूक
इदगाह मैदानावर महिलांना प्रवेश दिल्याबद्दल योगेंद्र यादव यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच कौतूक केले. पुढच्या वेळी मात्र या महिला व्यासपीठाच्या जवळ असाव्या, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले.

यादव म्हणाले....
-‘रिपब्लिक’ वाचविण्यासाठी ‘पब्लिक’ रस्त्यावर
- सर्वाधिक फटका भटके, आदिवासी, रोजंदारी काम करणाºया व्यक्तीला व कुटुंबाला बसेल
- एक हाती तिरंगा, दुसºया हाती संविधान, मनात अहिंसा व तोंडी जन, गण,मन घेऊन कायद्याविरुद्ध लढाई.
 

Web Title: Yogendra Yadav criticizes CAA, NRC for 'integration of country'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव