घरात खायलाच मिळत नाही म्हणून भीक मागून भरावे लागते पोट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:32+5:302020-12-23T04:13:32+5:30
जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आह़े. या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात ५ मुली व १६ मुले अशी २१ बालके आढळून आली. या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात १०८ मुले हरविल्याची नोंद पोलिसांकडे आहे. त्यात ४९ मुली तर ५९ मुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात केशवस्मृती प्रतिष्तान अंतर्गत समतोल प्रकल्पाचीही मदत घेतली जाते.
घरापासून दुरावलेले, हरवलेले आणि बालमजुरीच्या जोखडात अडकून पडलेल्या बालकांच्या सुटकेसाठी ऑपरेशन मुस्कान सुरू करण्यात आले आह़े या अंतर्गत अनेक बालकांना मुख्य प्रवाहात आणले. या अभियानात पथकांनी बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे, हॉटेल्स, ढाबे याठिकाणी भेटी देऊन तेथे काम करणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.
जिल्ह्यात मुले हरविल्याच्या तक्रारी संख्या
जानेवारी६४
फेब्रुवारी १०२
मार्च९२
एप्रिल २१
मे७५
जून६२
जुलै १०३
ऑगस्ट५०
सप्टेंबर २२३
ऑक्टोबर २०७
नोव्हेंबर६२
बाप दारु पितो...
बाप दारु पितो, आई त्याच्या त्रासाला कंटाळली आहे. मिळेल तेथून खायला जेवण मागून आणते, कधी मिळते तर कधी मिळत नाही. त्यामुळे भीक मागून थोडेफार पैसे मिळतात, त्यातून खायला घेतो. रेल्वे स्टेशन, बस स्थानक, झोपडपट्टी भागात किंवा मंदिर परिसरात जेथे जागा मिळेल तेथे झोपून घ्यायचे, हातपंपावर हातपाय धुवायचे व पुन्हा रोज भीक मागून पोट भरायचे, असा दिनक्रम असल्याचे एका बालकाने पोलिसांकडे सांगितले. या बालकाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
माय बापच नाही
या मोहिमेत काही वर्षांपूर्वी तर काही बालके अशी सापडली की, त्यांना त्यांचे माय बाप कोण? गाव कोणते, नातेवाईक कोण? याचीही माहिती सांगता आली नाही. अशा निराधार बालकांना बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले. ही बालके भुसावळ रेल्वे स्थानकावर आढळून आली होती. दरम्यान, काही बालके बालनिरीक्षणगृहातूनही निघून जातात. पुन्हा ते भीक मागणे व कचरा गोळा करून उदरनिर्वाह भागवितात. दरवर्षी असा अनुभव येतो.
माय बापांचेच दुर्लक्ष
काही बालके कचरा वेचताना तर काही बालके भीक मागताना सापडली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. काही दिवस त्यांच्याजवळ थांबल्यानंतर ते पुन्हा घरातून निघून जातात. आपला मुलगा कुठे गेला, याचा शोध घेण्याचीही तसदी पालकांकडून घेतली जात नाही. काही दिवसात ते परत येतात, असे उत्तर पालकांकडून मिळाले. या मुलांचेही घरात मन लागत नाही. भीक मागून मिळालेल्या पैशात चटपटीत खायला मिळते, घरी तसे मिळत नाही, असेही अनुभव आहेत.
पुनर्वसन करण्याचा प्रयत्न
जिल्हा पोलीस दलातर्फे केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्पाच्या मदतीने जिल्ह्यात हरवलेल्या बालकांसाठी ही शोध मोहीम राबविण्यात आली. सापडलेल्या बालकांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता यापुढे पुनर्वसन केले जाणार आहे.
- किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा.