तुम्हीच सांगा साहेब... रस्त्यांचे काम अजून किती दिवस ‘थांब’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 10:14 AM2022-03-14T10:14:04+5:302022-03-14T10:14:18+5:30
Jalgaon : सद्य:स्थितीत शहरातील सुमारे ५४० किमीचे रस्ते फुटले होते. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या ६१ कोटी रुपयांच्या कामातून रस्त्यांची कामे केली जात आहेत.
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून शहरातील काही रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. एकीकडे कॉलनी भागात रस्त्यांची कामे वेगात सुरू असली तरी शहरातील मुख्य भागातील रस्त्यांच्या कामांना मात्र ‘ब्रेक’ लागलेला आहे. विशेष म्हणजे या कामांना सुरुवात होऊन महिना झाला आहे. जर अशाच प्रकारे या रस्त्यांच्या कामांचा वेग राहिला तर शहरातील ५४० किमीचे रस्ते तयार करायला महापालिकेला अनेक वर्ष लागतील अशी भीती आता व्यक्त होत आहे.
सद्य:स्थितीत शहरातील सुमारे ५४० किमीचे रस्ते फुटले होते. सद्यस्थितीत जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या ६१ कोटी रुपयांच्या कामातून रस्त्यांची कामे केली जात आहेत. मात्र, मुख्य रस्त्यांच्या कामांचा वेग अतिशय संथ असून, या संथ कामांचा फटका वाहनधारकांना बसत आहे. अनेक ठिकाणी खडी टाकून दिली असल्याने, या खडीवरून वाहन घसरत आहेत.
या रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत
१. स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका, काही भागातील रस्त्याचे काम मात्र पूर्ण झाले.
२. बेंडाळे चौक ते सिंधी कॉलनी, कार्यादेश देऊन महिनाभराचा कालावधी झाला पूर्ण
३. ममुराबाद रस्ता ते टॉवर चौक, रस्त्यालगत खडी टाकून पंधरा दिवस पूर्ण, टॉवर चौकापर्यंत काम आलेच नाही.
४. स्टेट बँक ते बी. जे. मार्केट परिसर, खडी टाकलेली असून, पूर्ण कामाची मात्र प्रतीक्षा
..तर ४२ कोटींतील कामे पावसाळ्यापर्यंत पूर्ण अशक्य
एकीकडे शहरातील मुख्य भागातील रस्त्यांची कामे महिनाभरातदेखील पूर्ण होत नसताना, दुसरीकडे जर आता ४२ कोटी रुपयांतील कामांना शासनाची मंजुरी मिळाली, तर यामधून होणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापर्यंत पूर्ण होणे कठीणच आहेत. ४२ कोटींतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मार्चअखेरीस या कामांना मंजुरी मिळाली तरी एप्रिल व मे महिन्यांत शहरातील मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान मक्तेदाराला पार पाडावे लागणार आहे.
रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्याच्या कामाला सुरुवात
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून रेल्वे स्टेशन ते नेहरू चौक दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे स्टेशन ते जि.प. ते बळीराम पेठपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. तसेच शिवाजी नगरकडून मनपा शाळासमोरील रस्तादेखील रविवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.