चोऱ्या तुम्ही करायच्या अन् बिल आमच्या नावाने फाडायचे; गिरीश महाजन यांची एकनाथ खडसेंवर टीका
By सुनील पाटील | Published: October 24, 2023 10:03 PM2023-10-24T22:03:27+5:302023-10-24T22:03:45+5:30
एल.के.फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे गिरीश महाजन यांच्याहस्ते रात्री आठ वाजता रावणाचे दहन झाले.
जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांना गौण खनिज चोरी प्रकरणात १३७ कोटी रुपयांचा दंड झाला आहे. या प्रकरणात गुगल मॅपिंग झालेले आहे. एसआयटी स्थापन झालेली आहे. कुठे काहीही झाले तरी त्याची बिलं आमच्या नावाने फाडायची असा हा प्रकार आहे. आम्हाला आता त्यांची किव यायला लागली आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी खडसेंवर केली.
एल.के.फाऊंडेशनतर्फे मेहरुण तलाव येथे गिरीश महाजन यांच्याहस्ते रात्री आठ वाजता रावणाचे दहन झाले.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांना खडसे व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. महिनाभर ते दवाखान्यात होते. त्यांनी दीड महिना रुग्णालयात थांबायला सांगितले होते, पण ते अपुरा इलाज सोडून आले. म्हणून ते आजकाल काहीही बडबड करतात. घाणेरडी व असंसदीय भाषा बोलतात. कोणाच्या घरापर्यंत जाणं हे चुकिचे आहे. आता आम्हालाच त्यांची किव यायला लागली आहे.
राऊतांच्या डोक्याचा इलाज करावा लागेल
संजय राऊत यांडोक्याचा इलाज करावा लागेल असे त्यांच्याविषयी सर्वांचे एकमत झाले आहे. सरसंघचालकांनीही आमच्यासोबत यावे असे त्यांना वाटते. हे वेड्या माणसाचेच लक्षण आहे. प्रसिध्दीसाठी ते काहीही बोलतात. राऊंतामुळेच पक्षाला वाईट दिवस आले. ५४ पैकी १० आमदार, चार खासदार राहिलेले नाहीत. कार्यकर्ते राहिलेले नाहीत. यापुढे तर दोनच जण पक्षात राहतील, बाकी सर्व जण सोडून जातील, असे महाजन म्हणाले.
ड्रग्ज प्रकरणात कोणालाच सोडणार नाही
ड्रग्ज प्रकरणाचर मास्टरमाईंड ललीत पाटील हा कोणाचा माणूस आहे, कोणत्या पक्षाचा आहे. मातोश्रीवर त्याला कोणी प्रवेश दिला. उगाचच ठाकरे गट दुसऱ्यावर बेछूट आरोप करायला लागले. अमली पदार्थाचा वापर भयंकर, भयावह आहे. तरुणाईला आव्हान तयार झाले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या विषय गंभीर आहेत. कॅबिनेटमध्येही यावर चर्चा झाली. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरसकट बिमोड केला जाणार आहे. यात कोणीही असो मग तो भाजपचा असो, सामाजिक किंवा कोणत्या पक्षाचा आम्ही त्याला सोडणार नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.