"तुम्ही नवरदेव व्हाल, हा विषय जवळजवळ सोडून द्या"; इंदुरीकरांनी तरुणांना फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:20 AM2022-06-06T08:20:22+5:302022-06-06T08:21:31+5:30
आपल्या किर्तनातून समाजजागृती करताना महाराज प्रसंगारुप उदाहरणे देताना आपण पाहतो.
जळगाव - आपल्या हटके स्टाईल किर्तन आणि समाजप्रबोधनामुळे राज्यभर प्रसिद्ध असलेले लोकप्रिय किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. किर्तनातून अनेक दाखले देताना ते सद्यस्थितीवर भाष्य करतात. त्यातूनच, काहीवेळा त्यांच्या विधानाला आक्षेप घेतला जातो. यापूर्वीही त्यांनी कोरोना आणि लसीकरणावर भाष्य केलं होतं. त्यावरुन, त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. आता, पुन्हा एकदा कोरोना काळातील पास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमेतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
आपल्या किर्तनातून समाजजागृती करताना महाराज प्रसंगारुप उदाहरणे देताना आपण पाहतो. कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या असून पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यावरुनच महाराजांनी कोरोना आणि विद्यार्थी यासंदर्भात भाष्य केलं. कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले, त्यांना भविष्यात नोकरी मिळणार नाही, असे इंदुरीकरांनी म्हटलं आहे. जळगावात एका किर्तनादरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे, जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो, त्यापेक्षा बुद्धी पाहूनच पगार द्या, असे इंदुरीकरांनी म्हटलं आहे.
जगावर आलेलं कोरोनाचं संकट फक्त तिघांनी नियंत्रणात आणलं. पोलीस, डॉक्टर आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारानेच हे कंट्रोल झालं. यात, डॉक्टरांनी थोडासा टाकाटुका काढलाच, त्यांनी चांगलाच स्लॅब टाकला. त्यामुळे त्याचं कमी पण पोलिसांचं कौतुक जास्त करायला हवं. आपल्याकडे पोलिसांना पगार कमी आहे अन् काम नसणाऱ्यांना भरमसाठ. सर्व्हिसवाल्यांना बुद्धीवर पगार असायला हवा. 1 जानेवारीला मेंदू चेक करायचा आणि ज्याची बुद्धी कमी असेल त्यांचा पगार कमी करायचा, अशी मिश्कील फटकेबाजी इंदुरीकर यांनी केली. तसेच, ज्यांची लग्न राहिली आहेत, त्यांनी आता जवळजवळ तुम्ही नवरदेव व्हाल हा विषय सोडून द्या. वयाच्या 17 अन् 18 ला तुम्ही दारु पिता, मग कोण पोरगी देईल तुम्हाला, असे इंदुरीकर यांन या किर्तनात म्हटले.
दरम्यान, इंदुरीकरच्या किर्तनात सर्वात मोठा गुन्हेगार हा मीच आहे, कारण मी खरं बोलतो. या खरं बोलण्याचीच फळं भोगतो, असेही इंदुरीकर यांनी म्हटले.
मी माळकरी, म्हणून मला कोरोना झाला नाही
तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण, आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्मच आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता, तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच, असं महाराजांनी म्हणतात, जोरदार हशा पिकला. लातूरमध्ये आयोजित कीर्तनात महाराजांनी तिसाऱ्या लाटेबाबत भाष्य केलं होतं. तर, मी लस घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर, आरोग्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली होती.