जळगावातील तरुण अभियंता पुणे येथे दुचाकी अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:02 PM2018-07-04T13:02:33+5:302018-07-04T13:03:09+5:30
कुटुंबीयांना बसला धक्का
जळगाव : नोकरीनिमित्त पुणे येथे गेलेल्या अक्षय राजेंद्र बडगुजर (वय २५, खोटे नगर,जळगाव) या तरुण अभियंत्याचा पुणे येथे ट्रक अपघातात मृत्यू झाला आहे. १ जून रोजी रात्री आठ वाजता हा अपघात झाला. सोमवारी शहरात त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षय हा जिल्हा पोलीस दलातील हेडकॉन्स्टेबल राजेंद्र पंढरीनाथ बडगुजर यांचा एकुलता मुलगा होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय याचे बी.ई.पर्यंत शिक्षण झालेले होते. दोन वर्षापासून पुणे येथे खासगी कंपनीत चांगल्या पगारावर तो नोकरीला होता. मित्रांसोबतच तो भाड्याच्या घरात राहत होता.
१ जून रोजी मित्रांसोबत तो लोणावळा येथे दुचाकीने फिरायला गेला होता. तेथून परत येत असताना पुण्याजवळ दुभाजकावर वळण घेत असलेल्या ट्रकने अक्षयच्या दुचाकीला धडक दिली. डोक्याला मार लागल्याने त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने दवाखान्यात हलविले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यंदा होते लग्नाचे नियोजन
अक्षय हा अविवाहित होता. पुण्यात चांगल्या पगारावर नोकरी असल्याने त्याच्या लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली होती. चांगले दिवस आल्याने कुटुंब आनंदात असतानाच ही दुर्घटना घडली. मुलाच्या मृत्यूमुळे आई व वडीलांना मोठा धक्का बसला आहे.
आई, वडीलांना एक दिवस उशिराने कळविले
राजेंद्र बडगुजर यांना अक्षय हा एकुलता मुलगा होता. त्याच्यात आई व वडील यांचा प्रचंड जीव असल्याने त्याच्या मृत्यूची बातमी आई, वडीलांना लवकर कळवलीच नाही. मृतदेह घेऊन सोमवारी दुपारी शववाहिका फर्दापूरजवळ आली तेव्हा त्याच्या आई, वडीलांना घटनेची माहिती कळविण्यात आली. बडगुजर हे मुळ फुपनगरी, ता.जळगाव येथील रहिवाशी आहेत. राजेंद्र बडगुजर पोलीस दलात तर त्यांचा भाऊ संजय बडगुजर यांचा प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. बहिणीचे लग्न झालेले आहे.