तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी तरुणाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:36 PM2020-07-24T12:36:06+5:302020-07-24T12:37:30+5:30
जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला ...
जळगाव : मेहरुण तलावात मृतावस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणात विशाल संतोष भोई (२१, रा.रामेश्वर कॉलनी) याला रामानंद नगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने त्याला २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, विशाल याने तरुणीला गणपती नगरातून पळवून नेण्यासह कोल्हे हिल्स बंगल्याच्या परिसरात नेल्याचेही उघड झाले असून पोलिसांकडे तसे पुरावेही आहेत.
तांबापुरात राहणारी तरुणी व तिची आई रविवारी, १९ रोजी सकाळी ११ वाजता गणपती नगरातील रोहीत मनोहरलाल नाथानी यांच्याकडे धुणीभांडी करायला गेले होते. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील रेकॉर्ड व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार ही तरुणी विशालसोबत गेली होती. त्यानंतर नाथानी यांच्याकडेच काम करणाºया हरिविठ्ठल नगरातील एका महिलेला ही तरुणी कोल्हे हिल्स परिसरातील बंगल्याकडे दुपारी चार वाजता विशालसोबत दिसली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी ती मेहरुण तलावात नातेवाईकांना मृतावस्थेत आढळून आली. तरुणीने त्याच दिवशी तलावात आत्महत्या केल्याचा संशय असून गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरणाच्याच गुन्ह्यात दोन कलम वाढविले
१९ रोजीच या प्रकरणात तरुणीला फूस लावून पळविले म्हणून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता विशाल याला आरोपी करण्यासह वाढीव ३०६ व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियिम २०१२ चे कलम १२ चे कलम (पोक्सो) लावण्यात आले. चौकशीत आणखी कलम वाढण्याची शक्यता आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून यात आणखी कोणाचा सहभाग होता का याचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी विशाल याला न्या.एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.