नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची ५ लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:36 PM2019-11-12T22:36:21+5:302019-11-12T22:37:31+5:30
गुन्हा दाखल : नातेवाईकाकडूनचं फसवणूक
जळगाव - मुलाला आरोग्य खात्यात चालक म्हणून लावून देण्याचे आमिष दाखवत कुसुंबा रायपूर येथील सेवानिवृत्त रेमंड कर्मचारी मधुकर नारायण बाविस्कर यांची त्यांच्याचं जवळच्या नातेवाईकाने ५ लाख ६० हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे (रा. केकतनिंभोरा ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कुसूंबा येथील मधुकर नारायण बाविस्कर हे रेमंड कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पत्नी दोन मुले व सून असा त्यांचा परिवार आहे. मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासह नाशिक वास्तव्यास आहे. लहान मुलगा महेश चालक म्हणून खासगी नोकरी करतो. मधुकर बाविस्कर यांना नातेवाईक मामेभाऊ एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे याने त्यांचा मुलगा महेश याला चालक म्हणून आरोग्य खात्यात लावून देतो असे सांगून १० लाख रुपए लागतील असे सांगितले. त्यावर ९ लाख रुपए देईल असे सांगितल्यानंतर मधुकर बाविस्कर यांनी ११ नोव्हेंबर २०१४ रोजी एकनाथ सोनवणे यांना सुरूवातीला १ लाख रुपए रोख आणि मुलाचे सर्व कागदपत्रे नातवाईक सोनवणे यास दिले.
पूर्ण पैसे द्या, आॅर्डर देतो
काही महिन्यानंतर मधूकर बाविस्कर यांनी पुन्हा १४ सप्टेंबर २०१५ रोजी सोनवणे यास ५० हजार रुपए दिले. तेव्हा बाविस्कर यांनी मुलास नोकरी केव्हा लागेल अशी विचारणा केली, त्यावर सोनवणे याने तुम्ही मला संपूर्ण पैसे द्या, मी तुमच्या मुलास आरोग्य खात्यात वाहन चालक म्हणून आॅर्डर काढून देतो, असे उत्तर दिले. यानंतर बाविस्कर यांनी सोनवणेवर विश्वास ठेवून २४ फेब्रुवारी २०१६ रोजी १ लाख रुपए, २४ मार्च २०१६ रोजी २ लाख ४५ हजार रुपए, १६ जुन २०१६ रोजी प्लॉट विकून १ लाख २५ हजार रुपए, २१ जुन २०१७ रोजी पुन्हा प्लॉट विकून १ लाख ५० हजार रुपए, २४ जुलै २०१६ रोजी १ लाख ३० हजार रुपए असे एकुण ९ लाख रुपए दिले.
आॅर्डरची विचारणा करताच केली शिवीगाळ
३० आॅक्टोबर २०१७ रोजी बाविस्कर हे मुलासह जामनेर येथील बसस्थनाकावर सोनवणे यास भेटले. त्याला नोकरीची आॅर्डर कधी देतो, अशी विचारणा केल्यावर बाविस्कर यांना उलट सुलट शिवीगाळ केली, नातेवाईकांमध्ये माझी बदनामी करतो काय? तुझ्याने जे होईल ते करुन घे, असे अरेरावी करुन धमकी दिली व निघून गेला. पैसे करत करण्याचा तगादा लावल्यावर सोनवणे याने पैसे परत करण्याबाबत नोटरी करुन दिली. व त्यानुसार एकदा २ लाख तर दुसऱ्यांदा १ लाख ४० हजार असे एकूण ३ लाख ४० हजार रुपये बाविस्कर यांना परत केले. उर्वरीत पैसे आज देतो उद्या देतो, असे म्हणत उर्वरीत ५ लाख ६० हजाराची रक्कम परत केली नाही़ पैसे करत नसल्याचे लक्षात आल्यावर बाविस्कर यांनी अखेर १२ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीबाबत तक्रार दिली. त्यावरुन एकनाथ सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एकनाथ उर्फ छोटू आनंदा सोनवणे यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे़