फायनान्स कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:24+5:302021-06-24T04:12:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन अपमान केल्याच्या संतापात योगेश्वर नगरात राहणाऱ्या आशुतोष अनिल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांनी घरी येऊन अपमान केल्याच्या संतापात योगेश्वर नगरात राहणाऱ्या आशुतोष अनिल पाटील (वय २९, मुळ रा.असोदा, ता.जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष याने फायनान्स कंपनीकडून महागडा मोबाईल खरेदी केला होता. त्याचे हप्ते थकले होते. त्याची वसुली करण्यासाठी काही कर्मचारी मंगळवारी सायंकाळी घरी आले होते. दुचाकी घेऊन जाण्याचा दम त्यांनी भरला होता. वसुली करणारे घरी येऊन बोलून गेल्याने आपला अपमान झाल्याने संतापात त्याने रात्री राहत्या घरात गळफास घेतला. यावेळी वडिल हॉटेलवर तर आई बाहेर गेली होती. रात्री १० वाजता आई घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला.
दरम्यान, आशुतोष हा पुण्यात एका कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊनमुळे दीड वर्षापासून तो घरी आलेला होता. त्याचे वडील अनिल पाटील यांनी असोदा येथे हॉटेल डॉली या नावाने हॉटेल सुरु केले होते. सध्या तो हॉटेलचे कामकाज सांभाळत होता. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरातच गळफास घेतल्याचे आईच्या लक्षात आले. नातेवाईकांच्या मदतीने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहायक फौजदार मनोज इंद्रेकर यांनी पंचनामा केला. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आशुतोष हा एकुलता होता. एक बहिण आहे.