तापी नदीपात्रात उडी घेत तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:19 AM2021-08-15T04:19:05+5:302021-08-15T04:19:05+5:30
शहरातील जुना सातारा परिसरातील कोळी वाड्यातील धनंजय सुनील आंबोळकर (२४) या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ...
शहरातील जुना सातारा परिसरातील कोळी वाड्यातील धनंजय सुनील आंबोळकर (२४) या तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना लक्षात आली. मध्यरात्रीनंतर त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना कळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. माजी नगरसेवक भीमराज कोळी, युवराज पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी तापी नदीवर धाव घेतल्यानंतर मयताची ओळख पटवली. भुसावळ पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मयत तरुणाच्या पश्चात मोठा भाऊ, आई-वडील असा परिवार आहे. या घटनेने जुना सातारा, कोळी वाडा भागात हळहळ व्यक्त करण्यात आली.
हद्द ठरते डोकेदुखी
तापी नदीच्या मध्यभागापासून यावल तालुक्यातील फैजपूर पोलीस ठाण्याची हद्द सुरू होते. यामुळे या ठिकाणी रात्री-बेरात्री एखादी घटना घडल्यास नेमकी घटना कोणत्या भागात आहे, या हद्दीच्या वादावरून अनेकवेळा अपघात घडलेल्या व्यक्तीची मदत किंवा ओळखपासून इतर प्रक्रिया करण्यापर्यंत हेळसांड होते. हद्दीचा प्रश्न सुटल्यानंतर पुढच्या कामाला प्रारंभ होतो. यामुळे नदीच्या मध्यभागी हद्द ओळखण्यासाठी एकादा खांब लावावा अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांतून उमटत आहे.