मोटारसायकल अपघातातील गंभीर तरुणाचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:37+5:302021-08-12T04:21:37+5:30

अंकित महाजन : ११ आरएमएम ११ जगदीश महाजन :११ आरएमएम १२ रावेर : शहरातील मरीमाता मंदिर परिसरातील दोन तरुण ...

A young man died in a motorcycle accident | मोटारसायकल अपघातातील गंभीर तरुणाचाही मृत्यू

मोटारसायकल अपघातातील गंभीर तरुणाचाही मृत्यू

Next

अंकित महाजन : ११ आरएमएम ११

जगदीश महाजन :११ आरएमएम १२

रावेर : शहरातील मरीमाता मंदिर परिसरातील दोन तरुण मोटारसायकलने पालकडून रावेरकडे येत असताना विश्रामजिन्सी गावाजवळील दीपापाडा महाराज यांच्या मंदिरासमोर असलेल्या चढावाच्या वळण रस्त्यावर भरधाव वेगातील मोटारसायकल नियंत्रित न झाल्याने ती रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या खड्ड्यात पडली. या अपघातात २२ वर्षीय एक जण जागीच ठार तर दुसरा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. मात्र सोमवारी पहाटे उघडकीस आली. दरम्यान, जखमी युवकाचाही मंगळवारी उपचार घेताना मृत्यू झाला.

याबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील मरीमाता मंदिर चौकातील रहिवासी अंकित ज्ञानेश्वर महाजन (वय २२) व त्याचा मित्र जगदीश नंदलाल चौधरी (वय २०) हे दोघे मोटारसायकलने (एमएच - १९/डीबी-४८५२) ने रविवारी रात्री पाल येथे फिरून घरी परत असताना, मोटारसायकल वेगात असल्याने चालक अंकित ज्ञानेश्वर महाजन याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने चढावाच्या उंच गोलाकार वळण रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या खोल खड्ड्यात ते फेकले गेले. यात अंकित ज्ञानेश्वर महाजन याच्या गळ्यात मोटारसायकलच्या पायदानाची सळई घुसल्याने तो जागीच ठार झाला. तर त्यासोबत असलेला जगदीश नंदलाल चौधरी हा गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. ही घटना रविवारी रात्री घडली होती. दरम्यान, रस्त्याच्या कडेला खोल खड्ड्यात पडलेली मोटारसायकल व एक मृत व एका बेशुद्धावस्थेतील तरुणांकडे रात्रभर कुणाचेही लक्ष गेले नाही. दरम्यान, विश्रामजिन्सी येथील शेळ्या चारणाऱ्या युवकांना हा प्रकार सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ध्यानात आल्याने त्यांनी पोलीस पाटील गोकुळ प्रतापसिंग पाटील यांना यासंबंधी खबर दिली. मयत तरुणाचा मृतदेह व गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाला रावेर ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सर्वेश अर्कडी यांनी बेशुद्धावस्थेत गंभीर जखमी असलेल्या जगदीश महाजनवर औषधोपचार करून तातडीने जळगाव सामान्य रुग्णालयात पुढील औषधोपचारासाठी रवाना केले. तर मयत अंकित महाजन याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गंभीर जखमी झालेल्या जगदीश नंदलाल चौधरी (वय २०) याचाही मृत्यू झाल्याने शहरात एकच शोककळा पसरली आहे.

विश्रामजिन्सी येथील पोलीस पाटील गोकुळ प्रतापसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात मयत अंकित ज्ञानेश्वर महाजन याच्याविरुद्ध स्वतःच्या व मित्राच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिस शेख पुढील तपास करीत आहेत.

क्रूर नियतीची लागली परिवाराला दृष्ट...!

रावेर येथील वैष्णव संप्रदायातील वैकुंठवासी गोंडू बुवा यांची समाजमनात अत्यंत भाविक, सात्त्विक अशी प्रतिमा त्यांच्या मरणोपरांत समाजमनात घर करून आहे. तथापि, त्यांच्या तिघाही मुलांचा झालेला अकस्मात मृत्यू व या अपघातात नातवाचा झालेला मृत्यू पाहता समाजमनातून हळहळ व्यक्त होत आहे. श्री संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्यात आपल्या आजोबांची परंपरा कायम राखत अंकित महाजन याने पालखी सोहळ्यात मृदुंग वाजवून आपल्या स्मृती समाजमनात कायम ठेवल्या आहेत. क्रूर नियतीची या परिवारामागे लागलेली दृष्ट समाजमनाला तेवढीच चटका लावणारी ठरली आहे. दरम्यान, त्याचा मयत मित्र जगदीश चौधरी हा मूळचा बंभाडा, ता. बऱ्हाणपूर येथील असून उदरनिर्वाहासाठी त्याचा परिवार रावेर येथे वास्तव्यास आहे.

Web Title: A young man died in a motorcycle accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.