मोबाईलवर बोलत असताना रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:17 AM2021-01-03T04:17:09+5:302021-01-03T04:17:09+5:30
जळगाव : मोबाईलवर बोलत असताना सचखंड एक्सप्रेसच्या मागील बोगीखाली आल्याने २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ...
जळगाव : मोबाईलवर बोलत असताना सचखंड एक्सप्रेसच्या मागील बोगीखाली आल्याने २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९.४५ वाजता पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घडली. या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा तरुण परप्रांतीय असावा अशी शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तविली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता भुसावळकडून मनमाडकडे सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलत होता. रेल्वे रुळाजवळच तो उभा होता. रेल्वे पुढे गेली असे समजून तो रुळ ओलांडायला गेला, परंतु तेव्हा शेवटची बोगी पास होत होती व त्याच बोगीत हा तरुण अडकला व त्यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. खांब क्र.४१९२ दरम्यान ही घटना घडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्गचे सहायक फौजदार राजेश पुराणिक, सचिन भावसार व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ओळख पटविण्यासाठी त्याची अंगझडती घेतली असता त्यात काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्याची संध्याकाळपर्यंत ओळख पटलेली नव्हती. अंगात लालरंगाचा शर्ट, तपकीरी रंगाची पँट आहे. अंदाजे वय २५ ते ३० आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.