नवीन विद्युत लाईनचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 06:42 PM2021-02-10T18:42:36+5:302021-02-10T18:43:55+5:30
Young man dies of electric shock : नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे.
जळगाव : नवीन विद्युत लाईनचे काम करीत असताना पोलचे ट्रॅक्टर पलटी होऊन उच्च दाबाच्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून विशाल नुकूल गायकवाड (वय १८,रा.मोंढाळा, ता.भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजता चिंचोली, ता.जळगाव शिवारात घडली.
नेरी रस्त्यावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरु आहे.या कामावर मोंढाळा, ता.भुसावळ येथील कामगार रोज कामाला येत आहेत. बुधवारी दुपारी मुख्य वाहिनीच्या शेजारीच ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोल उभे केले जात होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. पोलला हातात धरलेल्या विशाल गायकवाड या जोरदार विजेचा धक्का बसला तर त्याच्याच शेजारी असलेले ईश्वर एकनाथ शेळके (३५), अक्षय वसंत घ्यार (२२) हे लांब फेकले गेले. विशाल याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय व ईश्वर हे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर इतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी संताप व्यक्त केला. वसंत घ्यार हे कामावर सुपरवायझर होते. दरम्यान,काम सुरु असताना मुख्य वाहिनीचा विज पुरवठा खंडीत करायला हवा होता, तो सुरु ठेवणेच तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगारांनी केला.
विशाल याचे दहावीपर्यंत शिक्षण झालेले होते. तो अविवाहित होता.वडील सोपान उर्फ नुकुल देवचंद गायकवाड, आई छाया मजुरी करतात तर मुलगी सुवर्णा अतुल शिंदे (रा.केकतनिंभोरा, ता.जामनेर) सासरी असते. विशाल हा एकुलता व कमावता मुलगा होता. मुलाच्या या घटनेने कुटुंबाने प्रचंड आक्रोश केला. मेहुणे, चुलत भाऊ व इतर कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.