नवीन विद्युत लाईनचे काम करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:18 AM2021-02-11T04:18:18+5:302021-02-11T04:18:18+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महामार्गावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ ...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महामार्गावर जुन्या विद्युत वाहिनीच्या शेजारीच नवीन विद्युत लाईन उभारली जात आहे. चिंचोली शिवारात राधाकृष्ण लॉन्सजवळ हे काम सुरू आहे. हे काम सुपडू पाटील (रा.पिंपळगाव, ता.बोदवड) या कंत्राटदाराने घेतलेले आहे. या कामावर मोंढाळा, ता.भुसावळ येथील कामगार रोज कामाला येत आहेत. बुधवारी दुपारी मुख्य वाहिनीच्या शेजारीच ट्रॅक्टरच्या साहाय्याने पोल उभे केले जात होते, त्यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्याने पोलचा मुख्य वाहिनीच्या तारांना स्पर्श झाला. पोलला हातात धरलेल्या विशाल गायकवाड याला विजेचा जोरदार धक्का बसला तर त्याच्याच शेजारी असलेले ईश्वर एकनाथ शेळके (३५), अक्षय वसंत घ्यार (२२) व वसंत बाजीराव घ्यार (५२) हे तिघं जण लांब फेकले गेले. विशाल याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय व ईश्वर हे जखमी झाले. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कामगार व नातेवाइकांचा संताप
या घटनेनंतर इतर कामगारांनी कंत्राटदार सुपडू पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने सर्व कामगारांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून संताप व्यक्त केला. ठाणे अमलदार जितेंद्र राठोड यांनी त्यांची समजूत घालून रुग्णालयात रवाना केले. वसंत घ्यार हे कामावर सुपरवायझर होते. दरम्यान,काम सुरू असताना मुख्य वाहिनीचा वीजपुरवठा खंडित करायला हवा होता, तो सुरू ठेवणेच तरुणाच्या जीवावर बेतल्याचा आरोप कामगारांनी केला.