रामदेववाडी तलावात बुडूत तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 01:26 PM2020-05-24T13:26:13+5:302020-05-24T13:26:22+5:30
महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापुर येथील पट्टीच्या पोहणा-यांना पाचारण करण्यात आले होते.
जळगाव : तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चेतन साहेबराव राठोड (१८) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रामदेववाडी, ता.जळगाव येथे घडली आहे. हा तरुण शनिवारी बुडाला होता. रविवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या शोधण्यासाठी महापालिकेचे पथक त्याशिवाय रामदेववाडी, शिरसोली, पाथरी, म्हसावद व गालापुर येथील पट्टीच्या पोहणा-यांना पाचारण करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदेववाडी येथे चार दिवसापासून नळांना पाणी येत नसल्याने गावातील तरुण तलावात आंघोळीसाठी जातात. शनिवारी चेतन, नवल पांडूरंग राठोड व सागर धनराज राठोड असे तिघं जण तलावात आंघोळीसाठी गेले. चेतन याला पोहता येत नसल्याने तो खोल खड्ड्यात गेला अन् जीव वाचविण्यासाठी आरडाओरड करायला लागला. हा प्रकार पाहून सागर व नवल दोघं जण मदतीला धावले, त्याशिवाय तलावाच्या दुस-या काठावर मासेमारी करीत असलेलेल हौसीलाल भोई हे देखील धावून आले. मात्र तलाव खोल व गाळ खूप प्रमाणात असल्याने चेतन हाती लागला नाही. त्यांनी हा प्रकार लागलीच गावात कळविला.
चेतन पाण्यात बुडाल्याची माहिती रामदेववाडी व वावडदा गावात पसरल्यानंतर गावक-यांनी धाव घेऊन तलावात शोध कार्य राबविले. रविवारी सकाळी चेतनचे नातेवाईक नानाभाऊ जेरी चव्हाण (रा.तळवण तांडा, ता.भडगाव) यांनी परत तलावात उडी घेऊन शोध मोहीम राबविली असता सात वाजता चेतनचे डोक त्यांच्या हाताला लागले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतन याच्या पश्चात वडील साहेबराव हरी राठोड, आई द्वारकाबाई व लहान भाऊ नितीन बहिण चैताली समाधान चव्हाण विवाहित आहे. चेतनच्या मृत्यूने कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. रवींद्र पाटील व म्हसावदचे पोलीस कर्मचारी सचिन देशमुख यांना सकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सचिन मुंडे यांनी पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.