हरिविठ्ठल नगरातील तरुणाकडे सापडले विदेश पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:21 AM2021-08-24T04:21:53+5:302021-08-24T04:21:53+5:30
जळगाव : हरिविठ्ठल नगरातील तडवी वाड्यानजीक असलेल्या टेकडीवर मद्यप्राशन करीत असलेल्या विनोद बापू शिंदे (वय २८, रा.हरिविठ्ठल नगर) या ...
जळगाव : हरिविठ्ठल नगरातील तडवी वाड्यानजीक असलेल्या टेकडीवर मद्यप्राशन करीत असलेल्या विनोद बापू शिंदे (वय २८, रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाकडे सोमवारी दुपारी विदेशी बनावटीचा पिस्तूल व पाच जीवंत काडतूस आढळून आला आहे. गुन्हेगार व चोरट्यांकडे आतापर्यंत गावठीच पिस्तूल मिळून आलेले आहेत. प्रथमच विदेशी पिस्तूल मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.
हरिवठ्ठल नगरातील एक तरुण टेकडीवर मद्यप्राशन करीत असलेल्या एका तरुणाकडे पिस्तूल असल्याचा निनावी फोन सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आला. ठाणे अंमलदार सतीश डोलारे यांनी लागलीच ही माहिती निरीक्षक किरण शिंदे यांच्या कानावर घातली. शिंदे यांनी हवालदार संजय सपकाळे, प्रवीण जगदाळे, सुशील चौधरी व उमेश पवार यांचे पथक घेऊन टेकडी गाठली असता तेथे विनोद शिंदे याच्याकडे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पुण्यात बहिण व मेहुणे वास्तव्याला असून मेहुणे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्याकडे पिस्तूल असल्याने त्याचा बहिणीला धोका होता म्हणून पुण्याला जाऊन हे पिस्तूल आणल्याचे त्याने तपासात सांगितले. दरम्यान, त्याच्या म्हणण्यात किती तथ्य आहे, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पुण्यात जाणार आहेत. त्यात तथ्य आढळले व परवाना नसेल तर त्याच्या मेहुण्यालाही आरोपी केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात आर्मॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.