तापीच्या पुलावरुन तरुणाने घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 07:52 PM2020-10-26T19:52:56+5:302020-10-26T19:53:03+5:30
आत्महत्येचा थरार : भुसावळ येथील घटना, ‘तो’ बनला सुसाइड पाॅईन्ट
भुसावळ : येथील तापी नदी पुलावरून एका तरुणाने उडी घेऊन सोमवारी आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. मात्र घटना कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली यावरून शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशन यांच्यात तब्बल तीन तास घोळ सुरू होता. तर मयताच्या खिशातून निघाल्या चिट्ठीवरून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाच्या हातावर प्रशांत लिहिले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर अंगात टी-शर्ट व दाढी ठेवलेल्या या तरुणासंदर्भात पोलीस ओळख पटवण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृतदेह नदीतून बाहेर काढला. शहर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. मात्र रात्री उशिरापर्यंत कोणत्याही पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली नव्हती.
तापी पुलावरुन आत्महत्येची महिनाभरातील तिसरी घटना
१ ऑक्टोबर रोजी विरेन्द्र रामा कोळी यांनी तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती . तर १४ रोजी एका महिलेने येथेच आत्महत्या केली होती. ती घटना फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. तर सोमवारी तरुणाने येथे आत्महत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
केली वाहतूक सुरळीत
घटना घडली त्यावेळी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे हे दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्तात व्यस्त होते. त्यांनी लागलीच पोलीस उपनिरीक्षक वैभव पेटकर , हे. कॉ. नागेंद्र तायडे , संजय पाटील , महेंद्र ठाकरे , विशाल साळुंखे, राजकिरण झाल्टे आदींनी घटनास्थळी पाठवले. या पथकाने तब्बल तीन तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
पोलीस पाटील म्हणतात घटना फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत
दरम्यान , घटना घडल्या नंतर शहर पोलिसांनी किरण वानखेडे रा. अकलूद , ता. यावल पोलीस पाटील यांना माहिती दिली व त्यांना घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी ही घटना फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन व फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना दिली. मात्र दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुलाच्या प्रत्येकी 14 पिलर येतात असा दावा फैजपूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केला. व ही घटना १४ व्या पिलरच असल्यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याचे सांगितले . तर पोलीस पाटील वानखेडे यांनी मी पोलीस पाटील पदाची सुत्रे घेतली . त्या वेळेस मला फैजपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ भिंती असल्याचे सांगण्यात आले होते , अशी माहिती उपस्थितांना दिली.