नीरगायच्या धडकेत तरुण ठार, परिसरात एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 11:15 IST2021-06-15T11:14:41+5:302021-06-15T11:15:03+5:30
Jalgaon : श्याम हा मनमिळावू व लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

नीरगायच्या धडकेत तरुण ठार, परिसरात एकच खळबळ
जळगाव : पाच मिनिटात येतो असे मित्रांना सांगून गेलेला श्याम शांताराम कोळी (वय ३६ रा. असोदा ता. जळगाव) या तरुणाचा मंगळवारी सकाळी भादली ते शेळगाव दरम्यान रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, त्याच्या डोक्यातून रक्त आलेले आहे तर दुचाकीला नील गायचे केस आढळून आल्याने नीरगायच्या धडकेतच श्याम ठार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रारंभी या घटनेविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. दोन दिवसापूर्वीच आसोदा येथील कोळी परिवारातर मायलेकाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा श्यामचा अपघाती मृत्यू झाल्याने गाव सुन्न झाले आहे.
श्याम हा मनमिळावू व लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात वडील शांताराम रामदास कोळी, आई कलाबाई, पत्नी सीमा, मुलगा हेमंत (वय ६) वैष्णवी (वय ३)व एक बहीण असा परिवार आहे. श्यामच्या दोन बहिणीचे यापूर्वी निधन झाले आहे. श्याम मजुरीचे काम करायचा. श्यामचे वडील ग्रामपंचायतीत शिपाई आहेत.