कोव्हीड सेंटरमधून घरी सोडलेला युवक अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:09 PM2020-06-07T22:09:25+5:302020-06-07T22:10:03+5:30
निंभोरासीम जवळील अपघात
रावेर : कोव्हीड केअर सेंटरला चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने गृहविलगीकरणाचा वैद्यकीय सल्ला दिलेल्या सचिन सुरेश पाटील या ३२ वर्षीय विवाहीत युवकाचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना ७ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतीकामे प्रलंबित झाल्याचे पाहून संबंधित गृहविलगीकरणातील युवकाने चुलतभावाच्या मालकीचे ट्रॅक्टर पातोंडी येथून निंभोरासीमकडे आणत असतांना, त्याच्या शेताजवळच ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या भीषण अपघातात तो जागीच ठार झाला. या दुदैर्वी घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.
रावेर पोलिसात शुन्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करून निंभोरा पोलिसात वर्ग करण्यात आली आहे. मयताचे वडील व गरोदर पत्नी कोरोना बाधित असल्याने त्यांना जळगाव कोरोना रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. तर त्याचे काका पॉझिटीव्ह होऊन यापूर्वीच मयत झाले आहे.