मद्यप्राशनसाठी पैसे न दिल्याने तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 08:22 PM2019-11-28T20:22:20+5:302019-11-28T20:22:43+5:30
पाळधी येथील घटना : दोघांनी टाकला डोक्यात लोखंडी रॉड
धरणगाव/पाळधी : येथील अंडाभूर्जीची गाडी लावणाऱ्या तीस वर्षीय युवकाचा लोखंंडी रॉड डोक्यात टाकून खून केल्याची घटना २७ रोजी मध्यरात्री पाळधी येथे घडली. आम्हाला मद्यप्राशनासाठी पैसे दे अशी मागणी दोघा आरोपींनी केली होती. नकार दिल्याने हे भांडण झाले. या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी एका तासात अटक केली.
पाळधी ता.धरणगाव येथील पथराड रस्त्यावरील पाटचारीजवळ ज्ञानेश्वर गंभीर पाटील (वय ३०) मूळ रा.डांगरी ता.अमळनेर यांचा गेल्या तीन-चार महिन्यापासून अंडापाव-भुर्जीची गाडी आहे. यावेळी आरोपी बबलू चैत्राम कोळी (वय २६) व बळीराम मांगो कुंभार (सिल्लोडकर) (वय २९) ( रा.पाळधी) या दोघांनी ज्ञानेश्वरच्या दुकानात मद्यप्राशन करीत अंडापावा खाल्ला. यानंतर ज्ञानेश्वर पाटील याच्याशी वाद घालून मद्याची मागणी केली. यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. ज्ञानेश्वर ने पैसे देण्यास नकार दिल्याने बबलू कोळी व बळीराम कुंभार या दोघांनी त्याचा डोक्यात जवळच पडलेला लोखंडी रॉड मारुन त्याचा खून केला व तेथून ते पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, पाळधी दूरक्षेत्रचे सपोनि हनुमंत गायकवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती घेवून भादंवि ३०२, ३४ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
एका तासात आरोपी अटकेत
या घटनेचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गोरे, चोपडा विभागाचे डीवायएसपी सौरभ अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यांशी चर्चा केली. लगेच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना एका तासात अटक केली.
आरोपींना १ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी
या घटनेतील संशयीत आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना धरणगाव न्यायालयात हजर केले असता न्या. सु.दा.सावरकर यांनी १ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली.
फोटो--१) मयत ज्ञानेश्वर पाटील
२)आरोपी बबलू कोळी व बळीराम कुंभार यांना अटक केल्यानंतर विचारपूस करतांना सपोनि पवन देसले व स्टाफ.